27.3 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home महाराष्ट्र यशोगाथा: भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’

यशोगाथा: भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’

0
10
अवघ्या ​४५ कलमांपासून ६ हजार झाडांपर्यंतचा प्रवास; आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीची सांगड
“शेती तोट्याची आहे”, “यात काही उरले नाही”, असा सूर आळवणाऱ्यांसाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे उघडणारा आहे. केवळ ४५ हापूसच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार कलमांच्या विशाल साम्राज्यात बदलला आहे. त्यांच्या याच अथांग मेहनतीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना मानाचा १ लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरुप असणारा ‘उद्यानपंडित’ पुरस्कार दिला आहे. ‘आंबेवाले केतकर’ म्हणून प्रसिद्ध असणारे धनंजय केतकर आता ‘उद्यानपंडित’ ठरले आहेत.
​सन १९७३ मध्ये धनंजय केतकर यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी केवळ ४५ कलमांच्या आधारावर या आंब्याच्या बागेची मुहूर्तमेढ रोवली होती. पुढच्या पिढीने हा वारसा तितक्याच निष्ठेने पुढे चालवला. चुलते, मोठे बंधू आणि संपूर्ण कुटुंबाच्या अखंड परिश्रमांतून आज भिले येथील बागेत तब्बल ६ हजार आंब्याची कलमे डोलत आहेत. यातील साडेतीन हजार कलमे सध्या व्यावसायिक उत्पादन देत आहेत. याशिवाय बागेत दीड हजार काजूची झाडे आणि १० ते १२ एकरावर भात व कडधान्याची पिकेही घेतली जातात.
​सेंद्रिय शेतीचा मंत्र आणि ‘नो दलाल’ पॉलिसी
​केतकर यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे त्यांनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा दिला आहे. गांडूळ खत, शेणखत, जिवामृत आणि गोकृपामृत यांच्या जोरावर संपूर्ण शेती फुलवली जाते. व्यावसायिक दूध विक्रीसाठी नव्हे, तर घरच्या दुधासाठी आणि शेतीला सेंद्रिय खत मिळण्यासाठी त्यांनी देशी गाई व म्हशींचे पालन केले आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा दर्जेदार आंबा कोणत्याही दलालाला न विकता थेट ग्राहकांना विकला जातो. यामुळेच ग्राहकांचा विश्वास आणि केतकरांचा नफा दोन्ही सुरक्षित राहते.
श्री. ​केतकर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी गवत कापणी यंत्र, पॉवर स्प्रे, ट्रॅक्टर आणि गांडूळ खत प्रकल्प उभारले आहेत. शिवाय १०० टक्के फलोत्पादनखाली लाभ घेतला आहे. आज त्यांच्या या १२० एकर क्षेत्रावरील शेतीचा डोलारा सांभाळण्यासाठी स्थानिक आणि नेपाळी मिळून सुमारे ७० कामगारांचा ताफा अहोरात्र राबत आहे.
​”शेतकऱ्यासारखा दुसरा राजा नाही…”
“गावागावांत मोफत धान्य मिळत असल्याने काहींमध्ये आळशीपणा आला आहे, शेती कशाला हवी अशी मानसिकता तयार होत आहे. पण, शेती हा आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच गाव, तालुका, जिल्हा पर्यायाने राज्य आणि देश समृद्ध होईल. प्रामाणिक प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर शेती आजही उत्तम आहे आणि उद्याही उत्तमच असणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यासारखा दुसरा कोणीही राजा नाही!”
— धनंजय केतकर (उद्यानपंडित)

निसर्गातील बदलांचे आव्हान झेलत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री केतकर यांनी घेतलेली ही झेप कोकणातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. ‘आंबेवाले केतकर’ ते ‘उद्यानपंडित’ हा प्रवास कृषी क्षेत्रातील एका नव्या क्रांतीची साक्ष देणारा आहे.​✍️प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते,जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी