राज्य सरकारची ‘महा ई-लॉकर’ सुविधा

0
5

मुंबई-नोकरीसाठीच्या मुलाखती, बँकेसंबधी कामे किंवा अन्य कारणांसाठी आपली महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत घेऊन फिरावी लागतात. कधी कधी तर, एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढावते. त्यामुळे कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची ही कटकट संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने ‘महा ई-लॉकर’ नावाचा एक उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ई-लॉकर सुविधा ही आधार कार्डशी संलग्न करण्यात आली आहे. आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
‘महा ई-लॉकर’ म्हणजे नेमके काय?
राज्य सरकारने ‘महा ई लॉकर’ ही सुविधा पूर्णपणे मोफत सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून जन्माचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्रे ई लॉकरमध्ये अपलोड करता येतात. आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण अपलोड करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता सॉफ्ट कॉपी आपल्या लॉकर मध्ये अपलोड केली जाईल. मात्र, या ई-लॉकरसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
या ई-लॉकरमुळे कधीही, कुठेही आपली महत्त्वाची कागदपत्रे हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करता येतील
१. elocker.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. इथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकून ‘साइन अप’ करा.
२. यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्ध्यातासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉगिन करावं लागेल. हा पासवर्ड टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’ वर क्लिक करा.
३. या प्रक्रियेनंतर तुम्हाला ६ अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरुपी असतो.
४. तुम्ही तयार केलेला पिन टाकून ‘व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा ‘महा डिजिटल लॉकर’ तयार होईल