सगळे गुजराती लबाड!: मुलायम

0
11

लखनऊ-राजकारणापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष’नेताजी’ मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मुलायम यांनी समस्त गुजराती समाजावरच लबाडीचा शिक्का मारला आहे. ‘सगळे गुजराती लबाड असतात. त्यांना खोटं बोलायची सवयच असते,’ असा आरोप त्यांनी केला आहे.

लखनऊ येथे झालेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला परिषदेत मुलायम सिंह बोलत होते. यावेळी मुलायम सिंह यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आश्वासने, स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बिनधास्त भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल सुटला. ‘नरेंद्र मोदी यांचे विकासाची वचने खोटी आहेत. आश्वसाने पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत आणि जो शब्द पाळत नाही तो माझ्या दृष्टीने भ्रष्टाचारीच आहे,’ असा टोलाही त्यांनी हाणला. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरूनही मुलायम सिंह यांनी मोदी यांच्यावर विषारी टीका केली. महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या मोदींची पत्नी कुठे आहे? तिचा शोध कोण लावणार? असा तिखट प्रश्न त्यांनी केला.

गरीबांच्या घरात जास्त घाण
‘स्वच्छ भारत’ मोहिमेविषयी बोलताना आपण काय बोलत आहोत, याचे भानही मुलायम यांना नव्हते. ते म्हणाले, ‘श्रीमंतांची घरं स्वच्छ असतात. गरीबांच्या घरात जास्त घाण असते. त्यामुळं खरी स्वच्छता झाडूने होणार नाही. गरीबी गेली तर आपोआपच भारत स्वच्छ होईल.’

सीता कुठे पदर घ्यायची?
महिलांमधील बुरखा व पडदा पद्धती बंद झाली पाहिजे, असं सांगताना मुलायम रामायण व महाभारतापर्यंत पोहोचले. ते म्हणाले, ‘पडदा पद्धती महिलांच्या प्रगतीसाठी मारक आहे. प्राचीन काळी ही पद्धत नव्हती. सीता आणि द्रौपदी कुठं पदर घ्यायच्या? त्या कोणत्या पडद्यामागे राहिल्या होत्या? मधल्या काळात बदललेल्या परिस्थितीमुळं महिलांना पडद्यामागं जावं लागलं,’ असं ते म्हणाले.