गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद, 6 सर्वसामान्य नागरिकांचाही मृत्यू

0
413

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.14ः दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारत-पाकिस्तान सीमा धमाक्यांनी दणाणून गेली. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर (नियंत्रण रेषा) शुक्रवारी तोफगोळे डागण्यास सुरुवात केली. भारतीय लष्करानेही त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानच्या ८ ते १० जवानांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भारताच्या ४ सैनिकांना वीरमरण आले. धुमश्चक्रीत ६ भारतीय नागरिकांनीही प्राण गमावले अाहेत. सूत्रांनुसार, भारतीय प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या ८ ते १० जवानांचा मृत्यू झाला. त्यात एसएसजीच्या (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) २-३ कमांडोंचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानचे १० ते १२ सैनिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कराचे बंकर आणि एलओसीवरील लष्करी चौक्याही मोठ्या संख्येने उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जाते.

अतिरेक्यांची घुसखोरी उधळली

भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया म्हणाले, ‘केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अतिरेक्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला. यादरम्यान उडालेल्या धुमश्चक्रीत भारताच्या ४ जवानांना हौतात्म्य आले. यात लष्कराचे २ जवान, एक कॅप्टन आणि बीएसएफच्या एका जवानाचा समावेश आहे.’

पाकिस्तानने डागले तोफगोळे

कर्नल कालियांनुसार, ‘घुसखाेरीचा प्रयत्न अपयशी झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून दुपारी पावणेदोन ते पावणेतीन वाजेपर्यंत तंगधार, उरी, गुरेज, केरन, नौगाम आदी सेक्टरमध्ये प्रचंड गोळीबार तसेच तोफगोळ्यांचा मारा केला. या तडाख्यात सापडून भारताच्या ६ नागरिकांचा मृत्यू झाला. भारताचे ४ जवान व ८ नागरिक जखमी झाले.

कोल्हापूरचा जवान ऋषिकेश जोंधळेला २० व्या वर्षी हौतात्म्य

सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (२०) हा जवान शहीद झाला. वयाच्या विसाव्या वर्षी देशरक्षणासाठी सज्ज झालेल्या ऋषिकेशची पहिलीच पोस्टिंग जम्मू येथे झाली होती. ११ जूनला तो सुटी संपवून जम्मूमध्ये कर्तव्यावर हजर झाला होता. २०१८ ला कोल्हापूर बीआरओ ६ मराठामध्ये तो भरती झाला. त्यानंतर बेळगावमध्ये ९ महिन्यांचे ट्रेनिंग झाले होते. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्याची लष्करात भरती झाली. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण आहे.