बुलडाणा,दि.14-बुलडाण्यातील ५० हजार वर्षांपूर्वीच्या लोणार सराेवराला पाणथळीचे क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबराेबरच हे देशातील ४१ वे रामसर साइट बनले आहे. रामसर पाणथळीच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. लोणार सरोवर १.२ किमी व्यासाचे आहे. हे सरोवर सतत रंग बदलते. त्यामुळे पर्यटकांत सरोवर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पृथ्वीला धडकलेल्या उल्कापिंडातून ५० हजार वर्षांपूर्वी हे सरोवर तयार झाले, असे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे जगभरातील संशोधकांनादेखील या सरोवरात नेहमीच रस दिसून आला आहे.
– मोठ्या प्रमाणात आर्द्रता तथा पाणी असलेली ही जागा आहे. सरोवराच्या आजूबाजूला दलदल असते. सरोवराच्या परिसरातील शेतीला पाण्याची वेगळी गरज भासत नाही. – १९७२ मध्ये इराणच्या रामसरमध्ये आंतरराष्ट्रीय संमेलन झाले होते. त्यात वेटलँडला आंतरराष्ट्रीय आेळख दिली जावी असा ठराव मंजूर झाला होता. यादीही जाहीर केली जाणार होती. त्याला रामसर असे संबोधले गेले. – भारतात एकूण ४० रामसर साइट्स होत्या. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मणिपूर, तामिळनाडू, त्रिपुरा, केरळ, आेडिशा, जम्मू-काश्मीरमध्येही काही स्थळ समाविष्ट आहेत.