काळ्या पैशाबद्दल मूळ तपशिलाच्या एक टक्कादेखील माहिती भारताकडे नाही. मी इतर काही देशांना याबाबत मदत करीत असून, भारतालाही मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे ‘एचएसबीसी’चे माजी अधिकारी हर्वे फल्चियानी यांनी सांगितले.
पॅरिस- काळ्या पैशाबद्दल मूळ तपशिलाच्या एक टक्कादेखील माहिती भारताकडे नाही. मी इतर काही देशांना याबाबत मदत करीत असून, भारतालाही मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे ‘एचएसबीसी’चे माजी अधिकारी हर्वे फल्चियानी यांनी सांगितले.
फ्रान्समधून एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हर्वे यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, ‘जीनिव्हातील एचएसबीसीमध्ये गुप्त खाती असलेल्या हजारो जणांची यादी आठ वर्षापूर्वी जाहीर केली होती. त्यामध्ये ६०० भारतीयांची नावे होती. फ्रान्स सरकारने एचएसबीसीमध्ये बँक खाती असलेल्या भारतीयांच्या नावांची यादी २०११ मध्ये भारत सरकारला दिली होती. हे फक्त हिमनगाचे टोक आहे. याबाबत भारताने उद्या मदत मागितली तर आम्ही उद्याच प्रस्ताव देऊ, असेही ते म्हणाले.
हर्वे हे जिनिव्हास्थित एचएसबीसीमध्ये सिस्टम इंजिनीअर म्हणून काम करत होते. त्यांनी स्विस बँकांच्या इतिहासातील सुरक्षेचे सर्वात मोठे उल्लंघन करून एक लाख २७ हजार खात्यांची माहिती मिळवून ती २००८ मध्ये फ्रान्स सरकारला दिली होती. सुरुवातीला फरार झालेले, नंतर तुरुंगात गेलेले ४२ वर्षीय हर्वे आता अमेरिका, स्पेन, फ्रान्स आणि बेल्जियम आदी देशांना करचुकवेगिरी, सावकारी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत करीत आहेत.