काळ्या पैशांवरुन लोकसभेत गदारोळ

0
13

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी लोकसभेमध्ये काळया पैशांच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी सभापतींसमोरच्या मोकळया जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली.
या खासदारांनी काळया छत्र्या आणल्या होत्या. त्या छत्र्यांवर काळा पैसा परत आणा असा संदेश लिहीला होता. काळा पैसा परत आणण्यावरुन तृणमुलच्या खासदारांची घोषणाबाजी सुरु असताना, काँग्रेस, राजद, आप आणि समाजवादी पक्षाचे खासदारही त्यात सहभागी झाले.
हे सर्व खासदार काळा पैसा कधी परत आणणार त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहासमोर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत होते. छत्री दाखवणा-या तृणमुलच्या खासदारांना सभापती सुमित्रा महाजन यांनी इशारा दिला आणि विरोध प्रगट करण्यासाठी असे प्रकार बंद करा असे सुनावले.
प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्यासाठी नोटीस दिल्याचे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर हे नियमा विरुध्द होईल काळया पैशांच्या मुद्यावर दुस-या नियमातंर्गत चर्चा घेऊ असे महाजन यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या शेजारी बसले होते ते बोलण्याचा प्रयत्न करत होते मात्र गोंधळामुळे त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता. अखेर गोंधळामुळे सभापतींनी चाळीसमिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.