कोळसा घोटाळ्यात मनमोहन सिंग यांची चौकशी का नाही?, न्यायालयाचा सवाल

0
7

नवी दिल्ली- कोळसा खाणवाटक गैरव्यवहाराच्या प्रकरणात तत्कालीन कोळसा मंत्रालयाची सूत्रे सांभाळलेले आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी का केली नाही? असा सवाल विशेष न्यायालयाच्या खंडपीठाने मंगळवारी केंद्रीय अन्वेषण विभागासमोर(सीबीआय) उपस्थित केला.
कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात हिंदाल्को कंपनीच्या के.एम.बिरला यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरणाची मागणी देखील विशेष न्यायालयाने केली आहे. कोळसा घोटाळ्यात तत्कालीन कोळसा मंत्र्यांची चौकशी केली गेली का? असा सवाल विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भरत पराशर यांनी तपास अधिकाऱयांना विचारला असता नकारार्थी उत्तर मिळाले. यावर न्यायाधीशांनी या घोटाळ्यात कोळसा मंत्र्याची चौकशी करणे आवश्यक होते असे तुम्हाला वाटले नाही का? असे सुनावले. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱयांची चौकशीबाबत देखील विचारणा सीबीआयला केली.