नागपुरात 10 वर्षे नाव बदलून राहत होता तालिबानी दहशतवादी

0
344

नागपूर–अफगाणिस्तानवर तालिबानी नियंत्रणानंतर आता एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो नूर मोहंमद उर्फ अब्दुल हक याचा असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, 23 जून 2021 रोजी एका युवकाला नागपुरातून अफगाणिस्तानला हकलण्यात आले होते. तो युवक नूर होता. 30 वर्षीय नूर गेल्या 10 वर्षांपासून नागपूरमध्ये नाव बदलून राहत होता. आता नूरचा हातात मशीन गन घेऊन व्हायरल होत असलेला फोटो पाहून तपास संस्थांच्या चिंता वाढल्या आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे.

शहरातील दिघोरी परिसरात नाव बदलून राहणाऱ्या नूर मोहंमद याला 16 जून 2021 रोजी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली असता शरीरावर गोळ्या लागल्याच्या जखमा दिसून आल्या. यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ हाती लागले. अफगाणिस्तानच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि त्याला अफगाणिस्तानकडे सुपूर्द करण्यात आले होते.

टूरिस्ट व्हिसावर नागपुरात आला होता नूर
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूर 2010 मध्ये 6 महिन्यांच्या टूरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. त्याने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) मध्ये शरण मागणारा अर्ज केला होता. परंतु, त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. तेव्हापासून तो नागपुरात नाव बदलून बेकायदा राहत होता. त्याचा विवाह झालेला नव्हता तसेच तो शहरात चादरी विकायचा. अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या घरातून पोलिसांच्या हाती विशेष काही लागले नव्हते.

नूरचा भाऊ सुद्धा तालिबानी
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नूरचे खरे नाव अब्दुल हक असे होते. त्याचा भाऊ सुद्धा तालिबानी होता. गतवर्षी नूरने धारदार शस्त्रासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हाच तो पोलिसांच्या तावडीत सापडला आणि अफगाणी तालिबानी असल्याचे निदर्शनास आले. सोशल मीडियावर तो इतर काही दहशतवाद्यांना सुद्धा फॉलो करत होता.

आता पुढे काय?
अफगाणिस्तानात हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नूरचा हातात लाइट मशीन गन घेऊन फोटो समोर आला. तेव्हापासून तपास संस्थांची झोप उडाली आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्या शरीरावर बुलेट बांधण्यात आल्या आहेत. गेली 10 वर्षे तो नागपुरात स्लीपर सेल म्हणून काम करत होता अशी शक्यता सुद्धा नकारता येत नाही. नागपूर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या प्रकरणी NIA आणि महाराष्ट्र ATS ने उडी घेतली आहे. तसेच नूर ज्या ठिकाणी राहत होता तेथील नागपूर पोलिसांना सविस्तर तपास करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितल्याप्रमाणे, हा फोटो नूरचाच आहे का हे तपासण्यासाठी ठराविक तंत्रज्ञान नाही. त्यामुळे या प्रकरणावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही.