मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर

0
26

मुंबई-शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाचा तिढा सुटत नसल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरऐवजी ३ डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करण्याचा निर्णय न झाल्यास भाजपच्या आणखी मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सध्या केवळ १० मंत्री असल्याने विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी १ डिसेंबर रोजी घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र अजून शिवसेनेबरोबर तोडगा निघू न शकल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार ३-४ डिसेंबरनंतर होऊ शकेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजपबरोबर असलेल्या रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी पक्ष, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या सत्तेतील सहभागाविषयी भाजपने कोणतीही चर्चा अजून केलेली नाही. त्यांना विधानपरिषदेच्या जागा देण्याची भाजपची फारशी तयारी नसल्याने त्यांच्यासाठी केवळ महामंडळांचाच पर्याय दिला जाणार असल्याचे समजते.