आधी भाजपशासित राज्यातील भोंगे बंद करा-डॉ. प्रवीण तोगडिया

0
49

नागपूर,दि.20ः- राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. अशातच राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट असल्याचे भाजपवर आरोप होत असतानाच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आधी भाजपशासित राज्यातील भोंगे बंद करण्यात यावे, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती तेव्हा भोंगे बंद का केले नाही, असा सवाल केला आहे.
डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने व केंद्र सरकारने प्रथम भाजपशासित राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरावे. केंद्र सरकारने एक आदेश काढावा आणि त्यात ४८ तासांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे, असेही स्पष्ट करावे. रात्री १0 वाजेनंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले सरकार चालवित आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना भोंगे काढण्याचे थेट आदेश देऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने भोंगे काढण्याचे क ष्ट करावे, असेही ते म्हणाले. सध्या देशात महागाईवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दंगली पेटविण्याचे काही षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप करीत त्यांनी यापासून हिंदूंनी सावधान राहायला हवे, असे आवाहन केले. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ते हिंदूंना गोळीने मरू देणार नसल्याचा विश्‍वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. भाजपने जेव्हा मेहबुबा मुफ्तीसोबत युती केली तेव्हा भाजपने हिंदुत्व सोडले, अशी टीका कुणीही केली नव्हती. भाजपला सोडले म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे म्हणणे चुकीचे आहे. आपण केले ते बरोबर दुसर्‍याचे ते चूक, असे होत नाही. राष्ट्रीय स्वंयसंघाचे सरसंघचालक यांनी १५ वर्षांत अखंड भारत होईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचे स्वागत आहे. परंतु सत्तेत नसताना आश्‍वासन दिले जाते, सत्तेत असताना करून दाखवावे लागते. सत्ता स्वयंसेवकांकडे आहे तर त्वरित पावले उचलली गेली पाहिजे. ७ वर्षांत काश्मीरमधील हिंदूंना परत आणता आले नाही. आता एका महिन्यात त्यांना परत आणावे, तसेच सरसंघचालकांनी स्वत: एक रात्र तरी काश्मीरमधील हिंदूंसोबत राहावे, सरकारने पीओकेवर ताबा मिळवावा व सरसंघचालकांनी तेथे जाऊन शाखा लावावी, असा चिमटा डॉ. तोगडिया यांनी काढला. केंद्र व राज्य शासनात एक कोटी पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जावी अन्यथा बेरोजगारांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील यावेळी त्यांनी दिला.