PSI भरती घोटाळा; भाजपच्या या महिला नेत्याला पुण्यातून अटक

0
55

पुणे : पोलीस भरती तसेच आरोग्य विभाग भरतीतील अनेक गैरप्रकार आजपर्यंत उघडकीस आले. यांनतर आता PSI भरती घोटाळा समोर आला असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरांमधून होत आहे. दरम्यान, या PSI भरती घोटाळ्यात सध्या मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणात कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला यांना अटक केली. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकच्या सीआयडी विभागानं पुण्यातून ही अटक केली आहे.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दिव्या फरार होती. सूत्रांच्या माहितीनुसार, दिव्या यावेळी पुण्यात लपली होती. मात्र, आता अटकेनंतर आज सकाळी तिला कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती १८वी आरोपी आहे. दिव्याचा पती राजेश हगारगी याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

गुलबर्गा इथल्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींच्या शोधात होते. PSI भरती घोटाळ्याप्रकरणी दिव्या हगरगीला अखेर गुरुवारी रात्री पुण्यात अटक केली. याबाबतची सर्व माहिती कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी दिली आहे.

दिव्या कलबुर्गी येथे एक ज्ञान ज्योती संस्था चालवतात आणि भाजपच्या महिला युनिटच्या त्या अध्यक्षाही होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर पक्षाने तिला नोकरीवरून काढले आणि पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. दरम्यान, ती भाजपमध्ये सक्रिय होती आणि पदावरसुद्धा होती याची पुष्टी स्थानिक लोक आणि पोलीस अधिकारी करत आहेत. फेब्रुवारीमध्ये अरगा जनानेंद्र यांनी दिव्या यांची भेट घेतली. भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा प्रकार घडला.

वीरेश नावाच्या उमेदवाराने फक्त २१ प्रश्न सोडवले. त्यानंतर भरती परीक्षेत १२१ गुण मिळाल्याने सीआयडीच्या चौकशीत दिव्या यांचे नाव पुढे आले. त्या उमेदवाराचे परीक्षा केंद्र ज्ञान ज्योती संस्था होती. वीरेशला ७ वी रँक मिळाली होती, पण तपासात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दिव्या यांच्या संस्थेत अनेक उमेदवारांनी गैरवर्तन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, PSI पदासाठी प्रत्येक उमेदवाराकडून ६० लाख रुपयांची लाच घेण्याचा करार झाला होता. पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याचेही सीआयडीच्या तपासात उघड झाले.