अखेर मृगधाऱा बरसल्या… बळिराजा नवीन डावासाठी सज्ज

0
11

सुरेश भदाडे/ बेरारटाईम्स

देवरी,दि.19- सूर्याच्या दाहकतेमुळे लहान थोरांच्या देहाची होणारी आग शमविण्यासाठी आणि जगाचा पोशिंदा असलेला बळिराजा याच्या नवीन डावाची दमदार सुरवात करण्यासाठी अखेर मृगधार बरसल्याच. परिणामी, जगाचा पोशिंदा आपले सर्वस्व गहाण ठेवून पुन्हा एकदा नवीन डाव खेळण्यासाठी सज्ज झालाय. काल आणि आज झालेल्या दमदार पावसाने तालुक्यात सर्वत्र गारवा पसरला आहे.

देवरी शहरासह मुल्ला, चिचगड, ककोडी, पालांदूर आणि इतर अनेक भागांमध्ये कालपासून दोनदिवस पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सूनकडे चातकाप्रमाणे डोळे लावणाऱ्या नागरिकांसह सर्व प्राणीमात्रांमध्ये या पावसाने आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. मृग नक्षत्रात वेळेवर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत केल्या आहेत. पुढे भविष्याची चिंता न करता हा जगाचा पोशिंदा पुन्हा उत्साहाने पेरणीच्या कामाला लागला आहे. मृग नक्षत्राच्या उत्तर्धात बरसलेल्या पावसाच्या सरींनी अबालवृध्दांना सुद्दा गरमीपासून दिलासा दिला.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरवात केल्याने अनेकठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा शासन-प्रशासनासह नागरिक बाळगून आहेत. शेतकरी सुद्धा यावर्षी चांगल्या पावसाची नेहमीप्रमाणे अपेक्षा बाळगून आपल्या कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांचा उत्साह पाहून बी-बियाणे आणि रासायनिक खत विक्रेते सुद्धा आपापली दुकाने थाटून बसले आहेत. अशात शेतकरी राजा उद्याच्या भविष्याची तमा न बाळगता जवळ असलेले नसलेले सर्व पदरमोड करून भूमातेच्या कुशीला सजवायला निघाले आहेत. जगाच्या पाठीवर कोणी उपासी झोपू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी, पुन्हा एकदा मोठ्या जुगारासाठी सज्ज झाला. त्याची अपेक्षा मात्र एवढीच की, वरूनराजा यावर्षी तरी निराश करू नको, आम्ही दोनवेळ भरपोट जेवू एवढे जरी दिले, तरी परमेश्वरा तुझे आमच्यावर फार उपकार होतील रे! नेहमीच अस्मानी आणि सुल्तानी संकटे झेलणाऱ्या बळिराजाच्या पदरी यावर्षी तर भरभरून पडू देत.