शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई, वाचा कारवाईत कोणाकोणाची नावे

0
119

मुंबई | शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांची आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांची मनधरनी करण्याचे सर्व प्रयत्न करुन संपल्यावर आता महाविकास आघाडी सरकारने कारवाईचे शस्त्र उगारले आहे. मुंबईत उपस्थित रहाण्याचे अधिकृत पत्र पाठवून देखील आमदार आदेश पाळत नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र सुनिल प्रभु यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले आहे.शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना 48 तासाची मुदत दिली आहे, अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली. बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडले असून त्यांना आता वेगळा गट स्थापन करता येणार नाही, अशी माहिती पत्रकारांशी बोलतान सावंत यांनी दिली.

पुढे बोलताना सावंत यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, कमळाबाईकडे गेलात तर तुम्ही भगव्याला कायमचे मुकाल. तसेच या बंडखोर आमदारांच्या परतीच्या दरवाजांबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आम्ही त्यांना नोटीसा पाठवत असून सोमवार पर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत त्यांना उत्तर तयार ठेवायचे आहे. शेवटी बोलताना सावंत म्हणाले, आता त्यांनी प्रहारध्ये जावे अन्यथा भाजपमध्ये जावे.

दरम्यान, एकनाथ शिंदे, भरतशेठ गोगावले, संदिपन भुमरे, अबदुल सत्तार, संजय शिरसाठ, यामिनी जाधव, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, महेश सुर्वे, लता सोनावणे, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर, संजय रायमुळकर या 16 आमदारांवर कारवाई केली आहे.