बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले:शिवसेना-बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाने केले नामकरण

0
116

मुंबई- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटाचे नाव ठरले आहे. ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असे शिंदे गटाचे नाव ठरवण्यात आले असून, आज दुपारी चार वाजता याची घोषणा होणार आहे. आज दुपारी चार वाजता दीपक केसरकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

फक्त आमदारच नव्हे तर, संघटना, पक्ष आणि चिन्ह देखील आपल्यासोबत जोडण्याचे काम शिंदे करताना पाहायला मिळत आहे. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे म्हणतायत की, खरी शिवसेना आमची आहे कारण हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारी सेना आमची आहे. महाविकास आघाडीत शिवसेना नेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी तडजोड केली म्हणून, आम्ही या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

गटाचे नाव ठरले

आज दुपारी चार वाजता दिपक केसरकर हे पत्रकार परिषद घेणार असून, त्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांच्या गटाला शिवसेना- बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे.

ठाकरे नाव न घेता जगून दाखवा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोर एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर तिखट हल्ला चढवला. त्यांनी प्रामुख्याने बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंवर होणारी टीका फेटाळून लावत शिंदेंना त्यांचा मुलगाही खासदार असल्याची आठवण करवून दिली. उद्धव बंडखोरांना उद्देशून म्हणाले की- ‘शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा. जे विठ्ठल व बडव्यांवर बोलत आहेत, त्यांचाच मुलगा खासदार आहे. हे ते विसरले आहेत का. मी लायक नसेल तर पद सोडायला तयार आहे. मात्र, राठोडांवर आरोप होऊन देखील मी संभाळले. तरी ते गेले. माझे मुख्यमंत्रिपद मान्य नसणे, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.’

एकनाथ शिंदेंचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले:कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढली नाही, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

बंडखोर आमदारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सूडापोटी पोलिस संरक्षण काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. यासंबंधीचे पत्रही त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी खुलासा केला आहे. कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नसल्याचे म्हणत त्यांनी शिंदेंचे आरोप फेटाळले आहेत.

काय म्हणाले गृहमंत्री?

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी केलेले आरोप चुकीचे आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे आमची जबाबदारी आहे. कुठल्याही आमदारांचे संरक्षण काढलेले नाही. पोलिस नियमाप्रमाणे अलर्ट आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पोलिस दलातल्या अधिकाऱ्यांना काम करताना काही नियम, जबबादारी असते. ती जबाबदारी त्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडली की नाही, याचा आढावा अधिकारी घेतील.

वळसे-पाटील म्हणाले की, आमचे सरकार बहुमतात आहे. सरकार अल्मपतात नाही. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे त्यानुसार आमचे काम सुरू आहे. शिंदे गट येथे येऊन आपण शिवसेनेचे आमदार आहोत, हे सिद्ध करू शकणार नाहीत. नियम अतिशय स्पष्ट आहेत. त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. बंडखोर आमदारांचे काय चालले मला माहिती नाही. विधानसभा अध्यक्षांसमोर तो प्रस्ताव आला. त्यानुसार ते नियमानुसार निर्णय घेतील.

गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने ट्विटरवर माहिती दिली की, राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत.

शिंदेंच्या पत्रात काय होते आरोप?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटनुसार, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे, असा आरोप केला आहे. या ट्वीटसोबतच एकनाथ शिंदे यांनी एक पत्र जोडले असून हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डीजीपी रजनीश सेठ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांना उद्देशून लिहिलेले आहे. विद्यमान आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पोलीस सुरक्षा हटवण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या पत्रावर सर्व बंडखोर आमदारांच्या स्वाक्षऱ्याही आहेत.

… तर मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार जबाबदार

पत्रात इशाराही देण्यात आला आहे की, जर आमदारांच्या कुटुंबीयांचे काही बरे वाईट झाले तर यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेच सर्वस्वी जबाबदार असतील.

ते पळून गेले, सुरक्षेची जबाबदारी आमची नाही- संजय राऊत

यादरम्यान माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? स्वत:ला वाघ म्हणवता, मग बकरीसारखे का पळता? असा टोलाही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. या पळून गेलेल्या आमदारांवर 11 कोटी जनतेचा अविश्वास असल्याचेही म्हणाले.