नागपूर- काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले. काळा पैसा भारतात आणण्यासाठी वेळ लागणार हे माहिती होते, तर मोदींनी प्रचारावेळी १०० दिवसांत तो पैसा परत आणण्याचे खोटे आश्वासन का दिले, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे. केवळ लोकांची मते लाटण्यासाठीच त्यांनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले, असाही आरोप त्यांनी केला.
अण्णा हजारे सोमवारी नागपूर दौऱयावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काळा पैशांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. यासंदर्भात आणि मोदी यांना पत्र लिहिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. ते म्हणाले, काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. इतर देशांशी केलेल्या करारांवर काय तोडगा काढायचा, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे हा पैसा भारतात परत आणण्यासाठी वेळ लागणार हे मोदींना माहिती होते. मग त्यांनी १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन का दिले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला. परदेशात काळा पैसा असणाऱयांची नावे जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.