माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे निधन

0
11

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.आर. अंतुले यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
किडनी निकामी झाल्याने गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक निष्ठावंत काँग्रेसजन काळाच्या पडद्याआड झाला आहे. रायगडमधल्या आंबेत या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू अशी ए.आर.अंतुले यांची ओळख होती. अंतुले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिपद भुषवले होते. १९८० ते १९८२ दरम्यान अंतुले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.
अल्पसंख्यांक समाजातील ते पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होती. रायगड मतदारसंघातून ते चारवेळा खासदार म्हणून निवडून आले होते तर दोनवेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. १९९५ ते १९९६ दरम्यान त्यांनी केंद्रीय आरोग आणि कुटुंबकल्याण मंत्रीपद भूषवले होते. तसेच मनमोहन सिंग सरकारच्या काळात केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता.