एकनाथ शिंदे बंडानंतर प्रथमच रॅडिसन हॉटेलबाहेर; म्हणाले -‘लवकरच मुंबईत परतणार’

0
62

शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे प्रथमच गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर आले. यावेळी हॉटेलच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपला शिवसेनेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. ‘आमचा शिवसेनेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील सेनेचे नेते आपल्या संपर्कात येथील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. पण, त्यात कोणतेही तथ्य नाही. येथील सर्वजण हिंदुत्व व बाळासाहेबांची भूमिका घेऊन येथे आलेत. त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. शिवसेनेने त्यांच्या संपर्कात कोण आहेत हे सांगावे,’ असे ते म्हणाले.

प्रथमच हॉटेल बाहेर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे बंड मोडून काढण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बंडखोर आमदारांना 14 दिवसांचे संरक्षण प्रदान केल्यानंतर शिंदे मंगळवारी प्रथमच माध्यमांना सामोरे गेले. त्यात त्यांनी या घटनाक्रमामागे आपला व आपल्या समर्थकांचा कोणताही स्वार्थ नसल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न

ते म्हणाले -‘आम्ही शिवसेनेत आहोत. आमचा शिवसेनेला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. याविषयी कोणतीही शंका असू नये. आमचे सर्व निर्णय व भूमिका आमच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर स्पष्ट करतील. येथील सर्व आमदार आनंदात आहेत. सेनेचे काही नेते आपल्या संपर्कात 15 ते 16 जण असल्याचा दावा करत आहेत. हे आमदार कोण आहेत? हे त्यांनी सांगावे. सर्व स्पष्ट होईल. उगीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.’

रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर जमलेले प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी.
रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर जमलेले प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी.

लवकरच मुंबईला परतणार

शिंदे पुढे म्हणाले, ‘सेनेचे मुंबईतील नेते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही येथे 50 जण आहोत. सर्वजण स्वतःच्या मर्जीने आलेत. त्यांची भूमिकाही ठाम आहे. ते हिंदुत्व व बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेसाठी येथे आलेत. आमच्या पुढील निर्णयांची माहिती लवकरच जारी केली जाईल’ आपण लवकरच मुंबईला परतणार असल्याचा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.