‘धगधगती मशाल’ ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह:ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेब शिवसेना’ नाव मिळाले

0
35

नवी दिल्ली केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे पर्याय सादर करण्याचे निर्देशही दिलेत. त्यामुळे शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळते याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.

ते चिन्ह धार्मिक प्रतीके

ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात त्रिशुळ, उगवता सूर्य व धगधगती मशाल यांचा समावेश होता. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. आयोगाने शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

ठाकरे गटाला धगधगती मशाल

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे तीन चिन्ह पर्याय म्हणून दिले होते. त्यानंतर आयोगाने त्यांना धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

शिंदे गटाला निर्देश

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पक्षचिन्हासाठी 3 नवे पर्याय देण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे शिंदे गटाकडून आता कोणते नवीन तीन पर्याय दिले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पक्ष नावावर काय होणार?

उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ व ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही तीन नावे सादर केली होती. त्यातील ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला मिळाले. पण शिंदे गटाला ‘बाळासाहेब शिवसेना’ हे नाव देण्यात आल्यामुळे ठाकरे गट त्याला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

हा नैसर्गिक न्याय नाही- अनिल परब

शिवसेना नेते अनिल परब म्हणाले, आम्ही जी नावे आणि चिन्ह दिली त्यातील एक नाव मिळाले आहे. आम्ही जी नावे पक्षासाठी दिली होती यातील तिसरे नाव दिले आहे. पण त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. आमच्या दोन पर्यांयापैकी शिवसेना प्रबोधनकार ठाकरे हे नाव शिंदे गटाने आयोगाकडे पर्याय म्हणून दिले नव्हते, त्यामुळे आम्हाला हे नाव द्यायला हरकत नव्हती. हा नैसर्गिक न्याय नाही त्यामुळे आम्ही दिल्लीत हायकोर्टात आधीच दाद मागितली असून आमचे मुद्दे तेथे मांडू.

 खैरेंची प्रतिक्रीया

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव योग्यच आहे. आम्ही काल हे नाव दिलेलेच होते. पण शिंदे गटाला मिळालेले नाव मिळाले किंवा इतर बाबींविषयी उद्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल तेव्हा त्यावर आक्षेप येईलच. मशाल या चिन्हावरही आम्ही यापुर्वी औरंगाबादेत लढलेलो आहोत.

आमची धगधगती मशाल- पेडणेकर

शिवसेनेच्या मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली की, मशाल हे चिन्ह उषःकालाचे प्रतीक आहे. ती आम्ही मशाली पुन्हा पेटवू ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आमची धगधगती मशाल धगधगतच राहील.

आमचे ध्येय साध्य- संदीपान भुमरे

आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्हाला जे नाव मिळाले त्यात आम्ही समाधानी आहे. आता आम्हाला उद्या चि्न्हही मिळेल. आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. ते नाव आम्हाला मिळाले याबाबत आम्ही समाधानी आहे.