अभीष्टचिंतन:माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या 75 व्या अमृतमहोत्सव सोहळ्याला दिग्गजांची हजेरी

0
27

मुंबई- छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली त्या वेळी आम्हाला मोठा धक्का बसला होता, त्यातून सावरायला खूप वेळ लागला. पण भुजबळ जर शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते, असा गौप्यस्फोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.१३) केला. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला खा. शरद पवार, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

उद्धव म्हणाले, “भुजबळ तुम्ही एक गोष्ट तुम्ही चांगली केली की, बाळासाहेब असतानाच आपल्यातील वाद मिटवून टाकले. घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचे स्वागत केले. वैरभाव हा खूप टोकाचा शब्द झाला. पण मतभेद होते ते मिटवले, ते फार चांगले केले. पण त्या वेळी माँ असत्या तर आणखी चांगले झाले असते,’ अशी खंत ठाकरेंनी व्यक्त केली.

अब्दुल्लांमुळेच काश्मीर भारतात : शरद पवार
देशात काश्मीर राहिले त्यात फारूक अब्दुल्लांच्या वडिलांचे योगदान प्रचंड आहे. त्यानंतर फारूक अब्दुल्लांनीही काश्मीरसाठी योगदान दिले. त्यांची संपूर्ण निष्ठा भारतावर आहे, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी गुरुवारी मुंबईत काढले. तसेच छगन भुजबळांनी अत्यंत मोठा संघर्ष करून महाराष्ट्राची सेवा केली, असेही पवार म्हणाले. ‘मी ज्या विद्यापीठात शिकलो, त्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव देण्याचे श्रेय भुजबळ यांना जाते, त्यांनी अखंडपणे काम करण्याची भूमिका घेतली. त्यांनी उत्तमरीत्या समाजाची सेवा केली. महाराष्ट्राचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहतील, असेही पवार म्हणाले.’

https://twitter.com/i/broadcasts/1kvJpmYdWZOxE

कष्ट करून पैसा कमावला : भुजबळ
लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे, पहाटे तीन वाजता उठून भाजीपाला विकला, पुढे कंपन्यांना भाजी पुरवण्याचे कंत्राट घेत गेलो आणि पसारा वाढत गेला’, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्यावरील आरोपांना दिले. भुजबळ म्हणाले दाढी का ठेवता असा प्रश्न मला विचारला, त्यावर मी म्हटले, देशात महाराष्ट्रात दाढीवाल्याचे राज्य आहे. कुठे काळी दाढी, कुठे पांढरी आहे.

राम हिंदूंचेच नव्हे, तर विश्वाचे दैवत : अब्दुल्ला

देवाने आपल्याला एकसारखे बनवले आहे. भगवान राम हिंदूंचेच नाही, तर ते विश्वाचे दैवत आहेत. इंग्रज, रशियनांचेही ते देव आहेत. पण आज जाती-धर्मात फूट पाडली जात आहे, असे असले तरीही आपण फक्त भारतीयच आहोत, हेच आपण मानायला हवे, असे वक्तव्य काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केले. अब्दुल्ला म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताला मजबूत करावे लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. एक औषधी हिंदू खातो, ती मुस्लिमही खातो अन् शीखही पण ती बनवणारा कोणत्या धर्माचा आहे, हे आपण पाहत नाही. देवाने आपल्याला एकसारखे बनवले.