हिमाचल प्रदेश निवडणुकीचा बिगूल वाजला:एकाच टप्प्यात होणार निवडणूक; 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी

0
20

निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार या डोंगराळ राज्यात 12 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार असून, 8 डिसेंबर रोजी निकाल घोषित होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ​यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेनंतर हिमाचलमध्ये तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली आहे.

हिमाचलमध्ये सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 68 सदस्यीय हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. त्यानंतर 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. तद्नंतर 27 तारखेला उमेदवारी अर्जाची पडताळणी होईल. तर 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. राज्यात 12 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल व त्यानंतर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.

आयोगाने उमेदवारी भरण्याच्या तारखेपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

8 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे कार्यकाळ

हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 9 जानेवारी संपुष्टात येत आहे. हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्यातील 20 जागा राखीव आहेत. 17 जागा अनुसूचित जाती (एससी) व 3 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. 2017 मध्ये भाजपने या राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. तेव्हा भाजपने सर्वाधिक 44, तर काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. एका जागेवर CPIM व 2 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते.

मोदींची आघाडी, प्रियांका गांधींच्याही सभा

हिमाचलमधील सत्ता अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचारसभांचा धुरळा उडवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या भगिनी प्रियंका यांनी हिमाचलमधील प्रचाराची जबाबदारी स्विकारली आहे.