बीएसएनएलला मागे टाकत रिलायन्स जिओ बनली देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता कंपनी

0
11

खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये सरकारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला मागे टाकून देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता बनली आहे.

देशात दूरसंचार सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एका खासगी कंपनीने वायरलाइन श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मंगळवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जारी केलेल्या ग्राहक अहवालानुसार, जिओचे वायरलाइन ग्राहक ऑगस्टमध्ये 73.52 लाखांवर पोहोचले, तर बीएसएनएल चे ग्राहक 71.32 लाख होते.

बीएसएनएल गेल्या 22 वर्षांपासून देशात वायरलाइन सेवा पुरवत आहे, तर जिओने तीन वर्षांपूर्वीच त्यांची वायरलाइन सेवा सुरू केली होती.

यासह, ऑगस्टमध्ये देशातील वायरलाइन ग्राहकांची संख्या वाढून 2.59 कोटी झाली आहे, जी जुलैमध्ये 2.56 कोटी होती.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, वायरलाइन सेवा वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत ही वाढ खाजगी क्षेत्राने केली आहे. जिओ ने 2.62 लाख नवीन ग्राहक जोडले, भारती एअरटेल 1.19 लाख, तर व्होडा आयडिया (Vi) आणि टाटा टेलीसर्व्हिसेस ने या कालावधीत अनुक्रमे 4,202 आणि 3,769 नवीन ग्राहक जोडले.

याउलट, सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपन्यांनी – बीएसएनएल आणि एमटीएनएल – ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 15,734 आणि 13,395 वायरलाइन ग्राहक गमावले.

अहवालानुसार, देशातील एकूण दूरसंचार ग्राहक संख्या ऑगस्टमध्ये किरकोळ वाढून 1175 दशलक्ष झाली आहे, जिओने आणखी नवीन ग्राहक जोडले आहेत. तसेच, शहरी केंद्रांपेक्षा ग्रामीण भागांची वाढ जास्त झाली.

ट्राय च्या ऑगस्ट 2022 च्या ग्राहक अहवालात म्हटले आहे की, “भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या जुलै 2022 अखेर 117.36 कोटींवरून ऑगस्ट 2022 अखेरीस 117.50 कोटी झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत त्यात 0.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या व्यतिरिक्त केवळ रिलायन्स जिओ (32.81 लाख) आणि भारती एअरटेल (3.26 लाख) यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये नवीन मोबाइल ग्राहक जोडले, तर कर्जबाजारी खासगी कंपनी Vi ने या महिन्यात 19.58 लाख मोबाइल ग्राहक गमावले.

या कालावधीत बीएसएनएलने 5.67 लाख, एमटीएनएल 470 आणि रिलायन्स कम्युनिकेशनचे 32 ग्राहक गमावले.