नाशिक येथे २०० निवासी क्षमतेचे मुलींसाठीचे वसतिगृह सुरु होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0
4

मुंबईदि. 19 : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून नाशिक येथे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले‘इतर मागासवर्ग समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका आहे. नाशिक येथे सुरू करण्यात येणाऱ्या वसतिगृहात सारथी व महाज्योती या महामंडळाच्या त्यांच्या लक्षीत गटातील प्रत्येकी 75 मुलींना प्रवेश देण्यात येणार असून उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींना प्रवेश असे  200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण जनशताब्दी महोत्सव योजनेअंतर्गत नाशिक येथे बांधण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठीच्या वसतिगृहात सारथी व महाज्योती या महामंडळाच्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊन वसतिगृहाच्या दैनंदिन कामकाजावर सारथी व महाज्योती महामंडळाचे नियंत्रण असेल आणि वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सारथी महामंडळ करेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.