पुन्हा पेटली शिवशाही बस:नाशिकच्या सिन्नरमध्ये घटना

0
30

नाशिक- काल पुण्यात शिवशाही बस पेटल्याची घटना घडल्यानंतर आज पुन्हा नाशिकमध्ये भररस्त्यातच शिवशाही बसने पेट घेतला.नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी शिवारात अचानक आग लागली.

बसचालकाला वेळीच आग लागल्याचे निदर्शनास आल्याने त्याने तातडीने बर रस्त्याच्या बाजुला उभी केली व बसमधील सर्व 43 प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सर्व प्रवासी बालंबाल बचावले.

बसची गती अचानक मंदावली

पिंपरी चिंचवड आगाराची शिवशाही बस ही नाशिक सीबीएस येथून सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुणे (शिवाजीनगर) कडे जाण्यासाठी निघाली होती. सिन्नरच्या माळवाडी शिवारात ही बस आल्यानंतर बसची गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (वय ४१) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हळूहळू बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकानेही पाठीमागून बस पेटल्याचे बस चालकाला सांगितले.

फायर फायटर बटन दबलेच नाही

बसचालकाने तातडीने बस उभी करत वाहक आणि प्रवाशांना सावध करत लागलीच बसमधून खाली उतरण्याचे फर्मान सोडले. बसमध्ये बसवण्यात आलेल्या फायर फायटरचे बटन दाबून ते ॲक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या फायर फायटरचे बटन ऑपरेट न झाल्याने चालकाचा नाईलाज झाला. त्यानंतर एकेक करत प्रवासी तातडीने ५ मिनिटात खाली उतरले. तोपर्यंत बसने जोराचा पेट घेतला होता.

बस जळून खाक

प्रवासी सुखरूप खाली उतरल्यानंतर त्यांना तातडीने रस्त्याच्या बाजूला सुरक्षित स्थळी उभे करण्यात आले. दरम्यानच्या, काळात बसने पेट घेतल्याने आगीचे आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. आगीमुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक राजकुमार तडवी, हवालदार प्रवीण गुंजाळ व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रारंभीचा अर्धा तास एका बाजूने आणि तासाभरानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सिन्नर नगरपालिकेच्या दोन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.

दोन दिवसांत दुसरी घटना

दरम्यान, कालदेखील पुण्यात शिवशाही बसने अचानक पेट घेतला होता. तेव्हादेखील चालकाच्या प्रसंगावधामुळे बसमधील सर्व 42 प्रवासी बालंबाल बचावले होते. कालच्या बसचे इंजिन सातत्याने गरम होत होते. त्यामुळे यवतमाळमधून बस सावकाश पुण्याच्या दिशेने आणण्यात येत होती. परंतु पुण्यातील येरवडामध्ये आल्यावर बसने पेट घेतला. आजदेखील इंजिन गरम झाल्यामुळे तर ही दुर्घटना झाली नाही ना?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.