विनायक मेटेंच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

0
16

मुंबई-शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी कारचालक एकनाथ कदम विरोधात रसायनी (जि. रायगड) पोलिस ठाण्यात सीआयडीने कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.कदमला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. सीआयडीच्या चौकशीत त्याच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.

‘सीआयडी’ चौकशी झाली

मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेत मेटेंचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीची घोषणा केली. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सीआयडी चौकशी करून अहवाल सादर केलाय.

अहवालात काय आहे?

मेटेंच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी झाली. त्यासाठी अभियंत्यांचे एक पथकही तयार केले. त्यात मेटेंच्या चालकाची चूक झाल्याचे समोर आले आहे. मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनीही चालकावर जबाब बदलत असल्याचा आरोप केला होता. चालक अपघात ठिकाणाबाबत बोलत नसल्याचे ते म्हणाले होते.

फुटेजमध्ये आले समोर

मेटेंच्या अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. त्यानुसार कारचालक कदम ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे समोर आले. अपघातापूर्वी त्याने एकदम उजवे वळण घेत ओव्हरटेकचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

गंभीर प्रकार समोर

गाडीचा वेग, घेतलेला टर्न पाहता चालकाला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित होते. मात्र, तरीही त्याने ओव्हरटेक केला. त्यामुळे डाव्या बाजूला अपघात झाला. खरे तर हा ओव्हरटेक केलाच नसता, तर कदाचित अपघात टळला असता. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळेच सीआयडीने कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.