आदित्य ठाकरेंनी सोडले मौन:दिशा सालियानचा मृत्यू झाला, त्यादिवशी रुग्णालयात होतो; काय काढायचे ते काढा

0
18

नागपूर-दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावर अखेर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच मौन सोडले. दिशाचा मृत्यू झाला, त्यादिवशी आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य म्हणाले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून शिंदे गट आणि भाजपने रान उठवले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, तर विधिमंडळातही यावर गदारोळ झाला. सरकारने ‘एसआयटी’ चौकशीची घोषणा केली. यावर आज आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले.

“दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी बोलत राहावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. यावर आदित्य ठाकरे जेवढं बोलतील तेवढं एसआयटीचं काम सोप्प होणार आहे. १४ जूनला आदित्य ठाकरेंचे आजोबा पाटणकर यांचं निधन झालं. पण, १३ जूनला सुशांतसिंह राजपूतच्या घरी घटना झाली, त्याचा उल्लेख आम्ही करत आहोत. १३ जूनला आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवस होता. १३ जूनच्या रात्री २ वाजता आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकमेकांना ट्वीटरवर शुभेच्छा देतानाचा संवाद आहे,” असे नितेश राणेंनी सांगितलं.

काय म्हणाले आदित्य?

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले आहेत. या प्रकरणी विरोधकांनी वारंवार त्यांचे नाव घेत आरोप केले. लोकसभा ते विधानसभेपर्यंत हे प्रकरण गाजले. त्यामुळे आदित्य यांनी या प्रकरणावर उघडपणे भाष्य केले. आदित्य म्हणाले, दिशा सालियान यांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी रुग्णालयात होतो. त्या दिवशी माझ्या आजोबांचे निधन झालेले. त्यामुळे मला रुग्णालयात जावे लागले. विरोधकांना काय काढायचे ते काढू द्या. मात्र, एका 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोटाळा काढून महाविकास आघाडीने त्यांना हादरवून सोडल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

खरा चेहरा समोर

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांचा मुखवटा फाटला आहे. खरा चेहरा समोर आलाय. त्यामुळे लाज वाटते आणि किळस येते. ते आमच्याबरोबर होते. आता तिकडे गेले आणि खरा चेहरा दाखवतायत. आमचे सरकार असताना आम्ही गुंतवणूक आणली. रोजगार आणला. कर्नाटकाविरोधात भूमिका घेतली. मात्र, आता ते कर्नाटक आणि शेतकरी प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

“१३ जूनला तारखेला रात्री दिनो मोर्याच्या घरी पार्टी झाली. त्यापार्टीच्या नंतर हे लोकं सुशांत सिंहच्या घरी गेले होते. तिथे मोबाईल टॉवरच्या माध्यमातून कोण कोण होतं, हे समोर येईल. १३ जूनला आदित्य ठाकरे कुठे होते. ८ आणि ९ जूनला कुठे होते, याची माहिती एसआयटीने घ्यावी,” असे नितेश राणेंनी म्हटलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.