कालमर्यादेत जनतेची कामे गतीने करणे म्हणजेच सुशासन – अनिल पाटील

0
12

सुशासन सप्ताह कार्यक्रम

गोंदिया, दि. 23 :- कार्यालयापर्यंत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.  शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणजे प्रशासन होय.  त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत कालमर्यादेतच जनतेची कामे गतीने करणे म्हणजेच सुशासन आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

            सुशासन सप्ताहनिमित्त कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपजिल्हाधिकारी  स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव डॉ. विजय सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख  रोहीणी सागरे उपस्थित होते.

            सामान्य नागरिकांचा त्रास होणार नाही या उद्देशाने शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे व त्यांच्या कल्याणाच्या योजनाचा लाभ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते सुशासन सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

            ई-सुविधांचा वापर करुन लोकांच्या समस्या निराकरण करणे सोईचे होईल आणि कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या योजना लोकापर्यंत पाहोचविता येतील असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे एक दिवस शाळेसाठी व शनिवार दप्तरशिवाय या उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली

            तत्पूर्वी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे गृहभेट आपुलकीची आणि जिल्हयामध्ये राबवित असलेल्या धवलक्रांती  प्रकल्पांची व्हिडीओ दाखिवण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस, आरोग्य, महसूल विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच विविध विभागामार्फत त्यांनी राबविलेल्या उपक्रम, योजना यांची माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

              जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख संजय संगेकार यांनी जिल्ह्यामध्ये  राबवित असलेल्या तेजश्री योजना , धवलक्रांती प्रकल्प, (जिल्ह्यामध्ये दुग्ध  व्यवसायाची  स्थिती ), मशरूम  व्यवसाय, इत्यादी  योजना बाबत माहिती दिली.

                उद्दोजकता विभागाचे तेजस  ठाकूर यांनी जिल्ह्यामध्ये सुशासनाचे  आधारस्तंभ कसे असावेत याबाबत माहिती  दिली. प्रमोद महाजन कौशल्य विकास विभाग, किमान कौशल्य विकास योजना, सी.एन.व्ही ऍक्टची माहिती, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, उद्दमीता यात्रा, महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा, आकांक्षा प्रकल्प जिल्ह्यात राबवित असून या मध्ये नवीन युवकाकडून भरपूर  प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

                महसुल विभागामार्फत सचिन गोस्वामी  तहसिलदार गोरेगाव यांनी ई-हक्क, ई-पिक पाहणी, ई-चावडी इत्यांदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे विस्तार मोबाईल अँप वापरून कश्याप्रकारे  सामान्य नागरिकापर्यंत सुलभ  पधतीने पोहचता येईल याबाबत माहिती दिली.

                 गोंदिया जिल्हा पोलिस विभागामार्फत श्रीकांत हत्तीमारे  यांनी “पोलीस आपल्या दारी” हा नाविन्यपूर्ण  उपक्रमबाबत माहिती दिली. कायद्याच्या  चौकटीत कर्तव्य बजाविण्यासोबत जनतेच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करण्याबरोबरच त्यांना लोकाभिमुख सेवा देणे, पोलिसांच्या कामकाजात गतीमानता आणणे हा त्यामागील  उद्देश आहे.

                 आरोग्य  विभाग गोंदिया कडून  सिकलसेल टेस्टिंग शिबीर, माता सुरक्षित तर घर सुरक्षित  हा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवित  असल्याची  माहिती डॉ. दिनेश सुतार यांनी दिली .

              सामान्य जनतेच्या तक्रारीचे निवारण आपले सरकार पोर्टल मार्फत करण्यात येते ही प्रक्रिया जलद गतीने करण्यावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक एच. जी. पौनिकर यांनी सांगितले.

            कार्यक्रमाचे सूत्र संचालन अपर कोषागार अधिकारी, ल. हि. बाविस्कर यांनी केले. तर आभार प्रदर्शन एच. जी. पौनिकर  यांनी मानले.