पोलिसांना पदोन्नतीची नववर्षभेट; महासंचालक रजनीश सेठ यांचे सकारात्मक पाऊल

0
36

मुंबई:-राज्यातील हवालदार, पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सकारात्मक पाऊल उचलले असून लवकरच विभागीय पदोन्नती समितीची बैठक बोलावून पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे.महासंचालकांचा हा निर्णय राज्य पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांची भेट ठरणार आहे.

रजनीश सेठ यांनी पोलीस दलात अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीपासून विनंती बदल्यांचाही समावेश आहे.२०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती तसेच पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होणे गरजेचे असते. मात्र, गेल्या एका वर्षांपासून महासंचालक कार्यालयाकडून ‘डीपीसी’ची बैठकच झाली नव्हती. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात दाखल झालेल्या रजनीश सेठ यांना पोलिसांच्या पदोन्नतीबाबत विचारणा केली असता, त्यांनी लगेच महासंचालक कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘डीपीसी’बाबत माहिती घेतली. लवकरच ‘डीपीसी’ घेऊन पोलिसांच्या पदोन्नतीचा विषय निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, ‘डीपीसी’ची बैठक लवकरच होणार असून राज्यातील पदोन्नतीचा विषय मार्गी लागणार आहे. पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांनाही पदोन्नती देण्यात येईल. तसेच २०१३ मध्ये विभागीय पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना पदोन्नती देण्यात येणार आहे.

पोलीस दलातील विभागीय पदोन्नती समितीची बैठक आयोजित करून पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला जाणार आहे. त्याबाबत कार्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. ५२० पोलीस हवालदारांनाही पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.
रजनीश सेठ, पोलीस महासंचालक