धक्कादायक! अल्पवयीन मुलीची अडीच लाखांत विक्री, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

0
47

गोंदिया:- मावशीच्या मुलीकडे राहण्यासाठी पाठविलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री तिच्या मावशीची मुलगी आणि इतर नातलगांनी अडीच लाखांत जळगाव जिल्हयात केली. या प्रकरणाची माहिती मिळताच मुलीच्या वडिलाने विक्री करणा-यांविरोधात गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून मुलीची गुजरात राज्यातील सूरत येथून सुटका केली..

नात्यांना काळीमा फासणारी ही घटना गोंदिया शहरातील नंगपुरा-मुर्री परिसरातील लालपहाडी परिसरात घडली. सविस्तर असे की, छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील महादेवघाट भीमनगर येथील राजेश नावाच्या व्यक्तीच्या लग्नानंतर त्याला मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या दीड वर्षानंतर त्याची पत्नी मुलगी आणि पतीला सोडून निघून गेली. त्यानंतर राजेशने दुसरे लग्न केले. दुस-या लग्नानंतर त्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. पहिल्या पत्नीची मुलगी ही १५ वर्षाची झाल्यानंतर तिची एका तरुणासोबत मैत्री झाली.

याची माहिती घरच्यांना झाल्यानंतर मुलगी त्याच्यासोबत लग्न करणार या भीतीने त्यांनी त्या मुलीला गोंदिया शहराजवळ असलेल्या नंगपुरा-मुर्री येथील लालपहाडी नजीक राहणा-या मुलीच्या मावशीच्या मुलीकडे ठेवले, यादरम्यान मुलगी आणि सावत्र आई तिची फोन वरून विचारपूस करायची. दरम्यान सावत्र आई मुलीला भेटण्याकरिता मुर्री येथे आली.परंतु, मुलगी दिसून आली नाही विचारपूस केले असता काम करण्याकरिता नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे ती आल्यापावल्या परत रायपूर येथे निघून गेली. मात्र रायपूर येथील त्या मुलीच्या जुन्या मित्राने तुमच्या मुलीचे लग्न झाले असून तो फोटो मोबाईलमध्ये असल्याचे मुलीच्या वडिलांना सांगितले. यावरून मुलीची सावत्र आई आणि वडील पुन्हा नंगपुरा-मुर्री येथे आले.त्यांनी यासंदर्भात विचारले असता आम्हाला काहीही माहिती नाही. ती कुठे गेली याची ही माहिती नसल्याचे सांगितले.त्यामुळे संशय बळावल्याने मुलीच्या वडिलाने गोंदिया शहर पोलिसाकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

ती मुलगी गुजरात राज्यातील सूरत शहराच्या श्रीवल्लो नगरात असल्याचे कळल्याने पोलिसांनी तिथे जावून तिला आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी तथाकथित २७ वर्षीय नवरदेव रा. सावंगी. ता. पारोडा जि. जळगाव आणि त्याचा भाऊ व गोंदियातील लालपहाडी परिसरातील आरोपी पती-पत्नी आणि मुर्री येथील पती-पत्नी अशा एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे..

या प्रकरणातील मुलींचा मावशीची मुलगी तिचा पती व या प्रकरणात दलालांची भूमिका दोघे असे एकूण ५ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकरी एस.बी. ताजणे यांनी दिली.

मुर्री परिसरात त्या अल्पवयीन मुलीचा खोटा साक्षगंध सोहळा करण्यात आला. साक्षगंधात नवरदेवाकडून १ लाख ३५ हजार रुपये घेण्यात आले. सध्या ती अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गर्भवती आहे. गर्भात असलेल्या बाळाचे पितृत्व सिद्ध करण्याकरिता गोंदिया पोलिसांनी तथाकथित नवरदेवाच्या रक्तातील डीएनएचे नमूने घेतले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस.बी.ताजणे करीत आहेत.