राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दिलासा;तर उद्या तुरुंगाबाहेर येणार

0
20

मुंबई:-माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत.देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.