मुंबई लुटू देणार नाही:उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला सडेतोड उत्तर

0
18

मुंबई,दि.23ः उद्योग पळवले, आर्थिक केंद्र तिकडे नेले. आता त्यांना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायचीय. मात्र, काही झाले तरी मुंबई लुटू देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेला मेट्रो उदघाटन कार्यक्रम आणि भाषणाला जोरदार प्रत्युत्त दिले.मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘साहेब जन्मदिवस’ कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दार विकले जाऊ शकतात. ते विकत घेता येऊ शकतात. मात्र, इथे जमलेले विकणे जाणे शक्य नाही. विकत घेता येणे शक्य नाही. संजय राऊत अनुभव सांगत होते. त्यांनी गोऱ्या माणसांची आठवण सांगितली. मलाही येता येता एक माहिती कळली. मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. ते काळजीत होते. मला म्हणाले मुद्दामहून इथे आलो आहे. ते म्हणाले उद्या भाजपमध्ये चाललोय. त्यांच्या घरावर एफबीआयने रेड टाकल्याची बातमी वाचली. त्यांना काही कागदपत्रे सापडली. त्यामुळेच उद्या अमेरिकेचे अध्यक्ष मिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्याची बातमी येईल, असा टोला त्यांनी हाणला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आज प्रकाश आंबेडकर सोबत आलेत. काही वर्षांपूर्वी रामदास आठवले सोबत होते. मात्र, ते त्या कळपात गेले. आज प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने खऱ्या अर्थाने दोन्ही नातू एकत्र आलेत. सध्या देश हुकूमशाहीच्या दिशेने चाललाय. त्यांचे हिंदुत्व थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आडून त्यांनी भिंत उभारायची. त्या आडून पोलादी पकड निर्माण करायची आहे, अशी टीका त्यांनी मोदी यांचे नाव न घेता केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी चीनला गेलो होतो. अतिशय चांगला इंग्रजी बोलणारा दुभाषा होता. काही दवसांने तिथे ऑलिम्पिक होणार होते. त्याला मी विचारले, तू बीजिंगमध्ये का जात नाही? तो म्हणाला, मला जगायचे आहे. तिथे तेव्हा अनावधाने कोणी सरकारविरोधी बोलले, तर माणूस गायब होतो, अशी परिस्थिती होती. ती पोलादी पकड इकडे आणणे सुरू आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

आता पवारांचे मार्गदर्शन घेतात

सुभाषबाबू, प्रमोद नवलकरांचाही आज वाढदिवस आहे. विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होतेय. मात्र, त्या कलाकाराला चित्र रेखाटला व्यवस्थित वेळ दिला आहे का, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा वडील चोरणारी औलाद असा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, आता हे म्हणतात, शरद पवार गोड माणूस. मग महाविकास आघाडी सरकारचे असताना मला पवारांसोबत बसून हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. शरद पवारांच्या आहारी गेल्याचा कांगावा केला. आता शिंदे म्हणतात फोनवरून त्यांचे मार्गदर्शन घेतो. मग मी काय करत होतो, असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहात. ही कृती चांगली. मात्र, हेतू वाईट आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीने सांगितले की, नेताजींची शताब्दी जरूर साजरी करा. मात्र, त्यांचे विचार तुम्हाला पेलतील का? असा सवाल ठाकरे यांनी केला. ते डाव्या विचारांचे होते. मात्र, हा वारसा हडपण्याचा प्रकार आहे. यांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणी नव्हते. सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. त्या सरदार पटेल यांना हे आपले म्हणत आहेत. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराजही आमचेच म्हणत आहेत. हा वारसा हडपण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

भक्त अंध, पण गुरू सुद्धा…

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, चेहरा नरेंद्र मोदी यांचा असला तरी बाळासाहेबांशिवाय त्यांना मत मिळू शकत नाही. हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मत मागून दाखवा. तुम्ही मोदींचा फोटो लावून या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावून येतो. मग बघू, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. दोन – तीन दिवसांपूर्वी मोदी येऊन गेले. तीन वर्षे आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपुजन करू शकलात. मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो, पण गुरू सुध्दा….

मुंबई रक्त सांडून मिळवली

2002 पर्यंत मुंबई महापालिका तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली. कोस्टल रोड विना टोल आपण देतोय. मनपाचा उपक्रम हा त्या ठेवीतून. त्यातील 30-40 % रक्कम हा कामगारांचा आणि इतर कामांसाठी आहे. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते. त्यांना ती कापायची आहे. मराठी माणसाने ती रक्त सांडून मिळवली आहे. मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसे? कोश्यारींना खर तर हाकलून द्यायला हवे होते. आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त ही बातमी आली, याबद्दल ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.

बँकेतला पैसा जनतेचा

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आर्थिक केंद्र गुजरातमध्ये नेले. फिल्म सिटी न्यायचा प्रयत्न करतायत. आता दावोसमध्ये जाऊन बाकरवाडी उद्योग आणतायत. पुरणपोळी लाटण्याचा उद्योग वळवल्याचा दावा करत आहेत. मुंबईतला पैसा बँकेत ठेवला म्हणता. या ठेवी, हा जनतेचा पैसा आहे. कोस्टल रोड विदाउट टोल केला आहे. हा देशातला पहिला प्रयोग असेल. जिथे नागरिकांना टोल लागणार नाही. मात्र, त्यांचा मुंबईच्या पैशावर डोळा आहे. ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतायत. त्यांना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायची आहे. आर्थिक केंद्र तिकडे नेल्यानंतरही मुंबई आहे. ती त्यांना कंगाल कराचीय, अस आरोप त्यांनी केला.

त्यांचे तोंड काळे करणार

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, बुरी नजरवाले तेरा मूह आम्ही काला म्हणजे काला करणारच. रक्त सांडून मिळालेली मुंबई लुटू देणार नाही. गुलाम इथला पैसा सुरतला घेऊन जातील. आज कोश्यारींनी दूर होण्याची इच्छा व्यक्त केली. खरे तर त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होते. येथून पुढे त्यांनी महापुरुषांचा अपमान केला, तर यापुढे सोडायचे नाही. अपमान होऊन सुद्धा शेपट्या घालून थंड बसणारे शिवसैनिक कसे असू शकतात, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. आपले मुख्यमंत्री कर्नाटकात जावून कानडीत भाषण करतात. त्यांच्या मांडीला लावून बसू शकतात. या दगडांचा उपयोग कोण, कोण कसे करत हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेला हाणला.

संजय राऊतांचा शिंदे सेनेवर हल्लाबोल

एकदा बाळासाहेब ठाकरेंनी एका तलावात एक दगड फेकला. त्यांच्यासोबत अनेक जण होते. ते म्हणाले दगड का बुडाला. अनेकांनी कारणे सांगितली. मात्र, तिथे संजय राऊत नावाचा एक अति शहाणा माणूस होता. तो म्हणाला, दगड यासाठी बुडाला त्यांनी तुमचा हात सोडला. हे 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल सोमवारी षण्मुखानंदमध्ये झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांना केला.

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. आपण कागदी वाघ नाहीत. शिवसेना धगधगता निखारा आहे. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे. तो कोणत्याही शाहीला मिटवता येणार नाही. ते न्यायालय असो की, निवडणूक आयोग. आता ही नवीन मोदी सेना निर्माण झालीय. त्यांनी महाराष्ट्राच्या सीमा पार करून पाहिल्यात. मी काश्मीरला गेलो होतो. काश्मिरी पंडिताच्या एका कार्यक्रमात गेलो. ते सहा महिन्यांपासून धरणे आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी काय आहे, आजही काश्मीर हिंदूसाठी सुरक्षित नाही. ते निर्वासित झालेत.

ते छावण्यात राहतायत. मात्र, सरकार त्यांना काश्मीरला जायचा तगादा लावतायत. त्यांचे दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग सुरूय. स्वतः हिंदूत्ववादी म्हणणारे सरकार हजारो काश्मिरी पंडिताचे स्वतःच्या स्वार्थासाठी बळी घेते आहे. तिथे माझे आगमन झाल्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे अमर रहे ही घोषणा झाली. हिंदू पंडितातले काही तरुण उभे राहिले आणि मराठी घोषणा देऊ लागले. मी म्हणालो, मराठीत कसे काय बोलतायत. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने आम्हाला मुंबई, पुण्यात राहायला मिळाले. त्यामुळे मराठी बोलतो. हे आमचे हिंदुत्व. याच्या तुम्ही कसा सामना करणार, असा सवाल त्यांनी केला.

संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधताना म्हणाले की, लग्झेम बोर्ग नावाचे पंतप्रधान त्यांना भेटले म्हणे. ते म्हणाले तुम्ही इथे. हो आम्ही इथे. किती खोके देऊ तुम्हाला. येताय आमच्या पक्षात. ते म्हणाले नाही…नाही. आम्हाला खोके वगैरे नको. मी मोदीचा माणूस आहे. त्यामुळे त्यांनी फोटो काढला. पाठवला. आज माझी षण्मुखानंदमध्ये गाडी आली. तिथे चार गोरे लोक होते. बंड्या होता आमचा. एक म्हणतो पोलंडचा प्राइम मिनिस्टर, एक म्हणतो…..वगैरे..वगैरे. नाही. मात्र, ते म्हणाले आम्ही उद्धव ठाकरे यांची माणसे आहोत. त्यांचे भाषण ऐकायला आलो आहोत. लग्झेम बोर्गचे तिकडे…ते म्हणाले तो बोगसय. शिवसेना अखंड आणि अभंग आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही.

संजय राऊत म्हणाले की, एकच शेवटची गोष्ट सांगतो. एकदा बाळासाहेब ठाकरेंनी एका तलावात एक दगड फेकला. त्यांच्यासोबत अनेकजण होते. ते म्हणाले दगड का बुडाला…अनेकांनी अनेक कारणे सांगितली. तिथे संजय राऊत नावाचा एक अति शहाणा माणूस होता. तो म्हणाला, दगड यासाठी बुडाला, त्यांनी तुमचा हात सोडला. आम्ही दगडच आहोत. हे चाळीस दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला त्यांनी शिंदे सेनेला हाणला.