झाडीपट्टीच्या परशुराम खुणे पद्मश्री जाहीर

0
15

गोंदिया,दि.25ः  झाडीपट्टी रंगभूमीचे (Zadipatti) कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विदर्भाचा दादा कोंडके’ म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांनी अनेक वर्षे झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत देत परशुराम खुणे म्हणाले,”गेल्या 50 वर्षांपासून मी झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहे त्याचं फलित मला आज मिळालं. हा पुरस्कार मला झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण करायचा आहे”.

परशुराम खुणे पुढे म्हणाले,”गेल्या काही दिवसांत झाडीपट्टी रंगभूमीचा विस्तार झाला आहे. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या रसिकांचा मी आभारी आहे. झाडीपट्टी रंगभूमीची सेवा करण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी आजवर खूप साथ दिली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम मला बालाजी पाटील बोरकर यांची आठवण आली”.

परशुराम खुणे यांनी आतापर्यंत 800 पेक्षा अधिक नाटकांचे पाच हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. मराठी रंगभूमी त्यांनी गाजवली आहे. ‘संगीत एकच प्याला’ नाटकातील तळीराम, ‘सिंहाचा छावा’ मधील शंखनाद, ‘संगीत लग्नाची बेडी’तील अवधूत, ‘लावणी भुलली अभंगाला’मधील गणपा अशा त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.

डॉ. खुणे हे उत्तम जादूगार असून त्यांनी आपल्या या कलेचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी केला आहे. 20 वर्षे गुरनोली ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले खुणे शेतीत अनेक उपक्रम राबवून शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारही पटकावला आहे. दहा वर्षे झाडीपट्टी कला निकेतन मंचाचे अध्यक्ष राहिलेल्या खुणे यांना झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचाही मान मिळाला आहे.