चुलतकाकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार

0
13

लाखनी-लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घराशेजारील १६ वर्षीय किशोरवयीन चुलतकाकाने ६ वर्षीय पुतणीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता.२४) सायंकाळचे सुमारास उघडकीस आली. वैद्यकीय अहवालावरून लाखनी पोलिसांनी चुलतकाकावर लैंगिक अत्याचार व पोस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पीडितेस उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, पीडित बालिका लाखनीतील एका नामांकित शाळेत इयत्ता पहिलीत शिकते. मंगळवारी सकाळची शाळा असल्याने शाळा आटोपून ती घरी आली. दुपारच्या सुमारास खेळत असताना घराशेजारी राहणार्‍या १६ वर्षीय चुलतकाकाने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. पीडितेला रक्तस्त्राव होत असल्याचे समजताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. महिला वैद्यकिय अधिकार्‍यांनी बालिकेस तपासून लैंगिक अत्याचार झाल्याची पोलिसांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गोसावी, पोलिस हवालदार सुभाष राठोड, पोलिस शिपाई विठ्ठल हेडे व महिला पोलिस हवालदार मनीषा खेडीकर हे ग्रामीण रुग्णालयात जाऊन पीडितेस विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपबिती सगितली.
पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी तात्काळ पसार होण्याचे तयारीत असलेल्या चुलतकाकाला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तथा वैद्यकिय अहवालावरून चुलतकाकावर कलम ३७६ (१), ३७६(एबी) भादंवि तथा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २0१२ चे सहकलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेला उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा व त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे तपास करीत असून, विधी संघर्षीत बालकास बाल न्यायालयात पाठविण्यात आले आहे.