संत तुकारामांवरील चिखलफेकीमागे भाजप:काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप

0
10

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनंतर आता काँग्रेसनेही त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बागेश्वर बाबा यांच्या विधानामागे भाजप असल्याचा थेट आरोप केला आहे. ‘संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचे भाजप व भाजपप्रणित भोंदूंचे षडयंत्र आहे,’ असे ते म्हणालेत.

काय म्हणाले सचिन सावंत?

‘जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचे भाजप व भाजपप्रणित भोंदूंचे षडयंत्र आहे. सुधारणावादी विचारांना संपवून मुवाद पुनर्स्थापित करण्यासाठी सुधारणावादी महापुरुषांचे प्रतिमाभंजन करण्याचा हा डाव आहे. जनतेने डोळे उघडले नाही, तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल,’ असे सचिन सावंत सोमवारी एका ट्विटद्वारे म्हणाले.

काय म्हणाले होते पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री?

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या व्हिडिओत म्हणतात – ‘संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांना याविषयी विचारणा केली. तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?, असे तो म्हणाला. त्यावर तुकाराम त्या ग्रहस्थाला म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.’

धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, ‘त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा! प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली.’

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार व आमदार अमोल मिटकरी यांनीही बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. ‘बागेश्वर बाबांनी संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असेल, तर ते दाखवणे बंद करा. संत तुकारामांविषयी कुणी काही वादग्रस्त बोलले असेल, तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे,’ असे खासदार सुप्रिया सुळे याविषयी म्हणाल्या.

भाजपने केली माफीची मागणी

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकामार यांच्याविषयी बोलताना अत्यंत चुकीचा संदर्भ दिला. त्यांच्या विधानाने केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झाला. त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागावी, असे ते म्हणाले.