जिल्ह्यातही रायफल शुटिंगचे प्रशिक्षण

0
14

 गोंदिया-जिल्ह्यातही नेमबाजी खेळात आपले करिअर घडविण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नरत आहेत. मात्र जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने बाहेर जावे लागते. मात्र आता जिल्ह्यातही ही प्रतिक्षा संपली असून जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधुनिक पध्दतीने रायफल शुटिंगचे प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा रायफल असोसिएशनतर्फे आयोजित पत्रपरिषदेत सचिव अविनाश बजाज यांनी दिली.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, सहसचिव अमर गांधी, उपाध्यक्ष राजेश गोयंनका, प्रशिक्षक नैलेश शेंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड यांनी सांगितले की, मागील काही वर्षात पोलिस विभागासह वैयक्तिकरित्या नेमबाजी खेळ स्पर्धेत जिल्ह्यात खेळाडू घडत आहेत. नेमबाजी खेळात करिअर घडवू इच्छूकांना जिल्ह्यातच प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु होते. शासनाने यासाठी ५१ लाख उपलब्ध केले असून जिल्हा क्रीडा संकुलात करुन १0 मीटर शुटिंग रेंजची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी शासनाने अत्याधुनिक ६ रायफल व ६ पिस्टल उपलब्ध करुन दिले आहेत. २२ डिसेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून सध्या ९ ते १४ वयोगटातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अडीच हजार रुपये मासिक प्रशिक्षण शुल्क असून सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ४ ते ८ या वेळेत प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातच आता शुटिंगचे प्रशिक्षण मिळणार असल्याने नेमबाजी खेळ प्रकाराला चालना मिळणार असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडू जिल्ह्यातूनही घडतील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.