लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्पांसाठी सौदी अरेबियाच्या गुंतवणुकीचे स्वागत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
6

मुंबई, दि. 2:- सौदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागतच असेल. लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सौदी अरेबियाचा मित्र राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत सलेह इद अल हुसेनी यांची मुख्यमंत्री शिंदे यांची आज येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राजदूत अल हुसेनी यांनीही महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत गतिमान राज्य असून येथील गुंतवणूक दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करणारे ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह सौदी अरेबियाचे दूतावास प्रमुख सुलेमान इद अल कुताबी आदी उच्चाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योगासह विविध क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक पोषक वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. त्या दिशेने काम करणारे राज्य म्हणून आमची ओळख आहे. नुकताच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जगभरातील अनेक उद्योगांनी सुमारे १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार केले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येत्या काही काळात मुंबईचा पायाभूत सुविधांची दृष्टीने कायापालट झालेला असेल. आम्ही उद्योगस्नेही धोरण स्वीकारले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, हरित ऊर्जा अशा माध्यमातून पर्यावरण स्नेही गोष्टींना प्राधान्य दिले आहे. या दृष्टीने सौदी अरेबियाच्या विविध प्रकल्प, गुंतवणूक यांचे आम्ही स्वागतच करू.

यावेळी श्री अल हुसेनी यांनी महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईचे कौतुक केले. ते म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे. येथील कला क्षेत्रदेखील समृद्ध आहे. आम्हाला या कलाक्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याची इच्छा आहे. आम्ही भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे, त्यामुळे यातील मोठा भाग महाराष्ट्रात येईल, यात शंका नाही. अन्न व ऊर्जा या क्षेत्रांना आम्ही  प्राधान्य देण्याचे आमचे धोरण आहे. भारताशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी आमचे उभयपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असे आमचे प्रयत्न आहेत.

श्री अल हुसेनी यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतातील राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. नवी दिल्लीबाहेर एखाद्या शहराला दिलेली पहिली भेट ही मुंबईची असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.