कॉंग्रेस नेते थोरातांचा राजीनामा ;कॉंग्रेसला धक्का

0
21

मुंबई,दि.०७–काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली ‘भारत जोडो’ यात्रा दोन आठवडे महाराष्ट्रात ठिय्या मांडून होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रदेश काँग्रेसची इतर नेतेमंडळी देखील या यात्रेत सहभागी झाली होती.त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या राजकीय संघर्षाची परिणीती आज बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यात झाली आहे.

दरम्यान, थोरातांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमधील इतर नेतेही पटोलेंच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यजित तांबेंना पदवीधर निवडणुकीच्या एकदंर रणधुमाळीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात काँग्रेसमधील काही अदृश्य हातांनी मदत केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली होती. त्यामुळे शांत, संयमी आणि पक्षनिष्ठेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आणखी मोठे भूकंप होणार का याची आता उत्सुकता लागून राहिली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या राजकारणाला एक मोठे वळण मिळाले आहे. आमदार सत्यजित तांबेंचे मामा आणि काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षात उफाळून येत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये थोरातांच्या राजीनाम्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात घडलेल्या घडामोडी, सत्यजित तांबेंना डावललेली उमेदवारी, काँग्रेस हायकमांड आणि राज्य नेतृत्वात असलेला समन्वयाचा अभाव आणि महाराष्ट्र काँग्रेसला एकसंघ ठेवण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना येत असलेले अपयश आणि गटबाजीला अप्रत्यक्षपणे दिले जाणारे प्रोत्साहन याची तक्रार करणारे एक पत्र बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींना नुकतेच लिहिले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्यावर गटनेते पदाबाबतही कारवाई केली जाईल याची चर्चा काही काँग्रेसमध्ये सुरु झाली होती. मात्र, पटोलेंकडून काही कारवाई होण्यापूर्वीच थोरातांनी आपला राजीनामा दिला असून ते आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.