राज्यातील वीज ग्राहकांना 39 हजार कोटींचा झटका,महावितरणची वीज 2 टक्क्यांनी महागली

0
9

मुबई– आज राज्यभरातील महावितरणच्याही वीज ग्राहकांना तब्बल 39 हजार 567 कोटी रुपयांच्या दरवाढीचा झटका बसला आहे. वीज नियामक आयोगाने रात्री उशिरा महावितरणच्या वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.त्यानुसार 2023-24 मध्ये 2.9 टक्के तर 2024-25 मध्ये 5.6 टक्क्यांची दरवाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे वाढीव वीज दरामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या घरगुती वीज ग्राहकांबरोबरच औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांचे आर्थिक गणित पुरते बिघडणार असल्याचे दिसत आहे.

महावितरणने बहुवार्षिक वीज दर निश्चितीअंतर्गत जानेवारीमध्ये 67 हजार कोटी रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगाकडे (एमईआरसी) सादर केला होता. त्यावर जनसुनावणी झाल्यानंतर एमईआरसीने दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार घरगुती वीज ग्राहकांना पुरवल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेच्या दरात एक रुपयापासून तीन रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. यावरून घरगुती विजेच्या दरात 20-25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या सुमारे एक कोटी 80 लाख घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल फुगणार असल्याचे निश्चित झाले आहे.

39 हजार कोटींच्या वसुलीसाठी 21 टक्क्यांचा भार

वीज आयोगाने पुढील दोन वर्षांसाठी 2.9 आणि 5.6 टक्के एवढय़ा वीज दरवाढीला मंजुरी देतानाच 39 हजार 567 कोटी रुपयांच्या वसुलीला परवानगी दिली आहे. या रकमेत 2019 पासूनच्या विविध आकाराची थकबाकी आहे. सदर रकमेच्या वसुलीसाठी आयोगाने ऍव्हरेज बिलिंग रेटमध्ये (एबीआर) पहिल्या वर्षी 7.25 टक्के तर दुसऱया वर्षी 14.75 टक्के दरवाढ करण्यास परवानगी दिल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. त्यामुळे आयोगाने कमी वीज दरवाढ केल्याचे वरकरणी दिसत असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मोठय़ा रकमेची बिले येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वीज मीटर असलेल्या कृषिपंपाला वीज दर आणि व्हिलिंग चार्जेस मिळून 4.17 रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे, तर हॉर्स पॉवर ज्या पंपाचे बिलिंग होते त्यांना प्रति हॉर्स पॉवरसाठी 467 रुपये आणि 117 रुपये व्हिलिंग चार्ज आकारला जाणार आहे.

ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पथदिव्यांसाठी 6.63 रुपये प्रतियुनिट दराने तर महापालिका क्षेत्रातील पथदिव्यांना 8.07 रुपये दराने वीजपुरवठा केला जाणार आहे.

उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना पुरवल्या जाणाऱया विजेच्या दरातही वाढ झाली असून प्रतियुनिटसाठी आता 8.12 ते 8.43 रुपये एवढा झाला आहे.

️️ग्राहक संघटना अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागणार

वीज आयोगाने महावितरणला दिलेली वीज दरवाढ अन्यायकारक आहे. विजेच्या दरात अवाच्या सवा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहकांबरोबरच औद्योगिक ग्राहकांना आपला व्यवसाय टिकवणे कठीण होणार आहे. त्यामुळे वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात आम्ही केंद्रीय अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागणार असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.

️️स्थिर आकारात 11 रुपयांची वाढ

घरगुती ग्राहकांना आतापर्यंत प्रत्येक महिन्याला 105 रुपये स्थिर आकार लावला जात होता. त्यामध्ये 11 रुपयांची वाढ करून 2023-24 साठी 116 रुपये केला आहे, तर 2024-25 मध्ये 128 रुपये होणार आहे.

वीज आयोगाने महावितरणच्या वीजदरात मोठी वाढ केली असली तरी वीज वहन आकारात मात्र काहीशी कपात केली आहे. आतापर्यंत प्रतियुनिटला 1.35 रुपये वहन आकार लावला जात होता तो 1.17 रुपये केला आहे.

वीज आयोगाने पुढील दोन वर्षांसाठी 2.9 आणि 5.6 टक्के एवढय़ा वीज दरवाढीला मंजुरी देतानाच 39 हजार 567 कोटी रुपयांच्या वसुलीला परवानगी दिली आहे. या रकमेत 2019 पासूनच्या विविध आकारांची थकबाकी आहे.

घरगुती ग्राहकांचा वीज दर (रुपयांमध्ये)

वीज वापर सध्याचा दर नवा दर

(युनिट) (2023-24)
0-100 3.36 4.41
101-300 7.37 9.64
301-500 10.37 13.61
500 पेक्षा जास्त 11.86 15.57