हिंदूंचा नेता देशाचा पंतप्रधान असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो : उद्धव ठाकरे

0
11

छत्रपती संभाजीनगर :-तुम्ही स्वत:ला देशातला सर्वात मोठा नेता मानता, हिंदूंचे नेते देशांचे पंतप्रधान झाले आहेत, असे असूनही हिंदंूना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हा नेता काय कामाचा? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे,विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिन्ही पक्षांनी मिळून ही सभा आयोजित केल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनचे अनेक नेते, उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच पुढं जाणार हे आजच्या सभेतून स्पष्ट झालं आहे.

तीनही पक्षांची मिळून पहिली सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरात झाली. यावेळी पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार असताना कोणालाही आक्रोश करावा लागला नाही. नुकताच हिंदु आक्रोश मोर्चा मुंबईत निघाला, तो शिवसेना भवनासमोर देखील आला होता. मी हिंदुत्व सोडलं असा आरोप माझ्यावर केला जातो. मात्र असे एक तरी उदाहारण मला दाखवून द्या. आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असे सांगितले जातो. मग तुम्ही जेव्हा काश्मीरमध्ये मेहबुबा फुफ्ती यांच्या मांडीला मांडी लावून बसले. तेव्हा ते काय होते. आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे. असे म्हणत आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही, मंदिरात घंटा बडवणारे हिंदूत्व आम्हाला नको, हे प्रबोधनकारांचे विचार आम्ही मानतो. असे ठाकरे म्हणाले.

हिम्मत असेल मोंदीना महाराष्ट्रात आणा : आमच्या पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले, आता वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही कदापी होऊ देणार नाही. हिम्मत असेल तर तुम्ही मोंदीना महाराष्ट्रात आणा. मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्रात येतो. सभेत वाचू का विचारणाऱ्यांना ही जनता जेव्हा मतदानासाठी उतरेल तेव्हा त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. गरज होती तेव्हा भाजपाने आम्हाला वापरुन घेतले. आता त्यांचे नामोनिशाण मिटवल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा, विधानसभा एकत्रित लढणार;
अजित पवारांचा वज्रमुठ सभेतून निर्धार

महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले.महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून राज्याच्या सगळ्या विभागात सभा घेणार आहोत. महाराष्ट्रावर संकट आल्यास मराठी माणूस पेटून उठतो. या भाषणानंतर कार्यकर्ते योग्य संदेश घेऊन जातील, यामध्ये शंका नाही . महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाविकास आघडीची सभा घेणार होतो, मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार आहे. सरकार पाडण्याचा केविलावणा प्रयत्न झाला. असे होत राहिल्यास तर स्थिरता राहणार नाही, ते राज्याला परवडणार नाही. उद्योगधंदे येणार नाही. प्रशासनाला विश्वास राहणार नाही त्यामुळे ते चांगलं काम करणार नाहीत. निवडणूक आयोगही असं निर्णय देत असल्यास कस होणार? न्यायदेवता न्याय देईल, अशी भावना आहे.

अजित पवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी मुख्यमंत्री13 मिनिटे देतात. एवढी उपेक्षा आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने केली नसेल. तुम्ही सर्वसामान्यचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखील बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणाही त्यांनी केली.

महागाई बेरोजगारी वरून लक्ष हटविण्यासाठी घटना

अजित पवार म्हणाले की, राज्यात उद्योग येणार होते, पण यांचा पायगुण चांगला नाही उद्योग सगळे निघून गेले. 75 हजार नोकर भरती होणार होते किती लोकांना दिली? कांदा अनुदान जाहीर केले पण अटी घातल्या. जाती धर्मात भेदभाव केला जात आहे. आज गौरव यात्रा काढता, तुमच्यात धमक असले तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटविण्यासाठी घटना घडत आहेत. महाविकास आघडीची सभा होऊ नये म्हणून घटना घडल्या.

हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या : अजितदादा शेतीमालाला भाव नाही, बेरोजगारी वाढते आहे, या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे. केंद्रात तुमचे सरकार आहे.हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला तेव्हा यांची दातखीळ बसली होती, आता गौरव यात्रा कसल्या काढता? असे अजित पवार म्हणाले.

कितीही यात्रा काढा, फरक पडणार नाही : चव्हाण ही विराट सभा पाहिली की कितीही गौरव यात्रा काढा, काही फरक पडणार नाही. अदानी यांना वाचवण्यासाठी सरकार का प्रयत्न करत आहे? एवढेच राहुल गांधी यांनी विचारले होते. त्यांना लोकसभेत बोलू दिले गेले नाही. लोकशाहीची विटंबना सुरू आहे. लोकशाही टिकवायची की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.