राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा

0
44

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांची मागणी

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच समोर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.

धनंजय मुंडेंनी शरद पवारांचे पाय धरले

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंसह काही नेत्यांनी तर व्यासपीठावर जात शरद पवारांचे पाय धरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, नेते व कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार आता काय बोलतात? आपला निर्णय मागे घेणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

शरद पवार नेमके काय म्हणाले?

‘लोक माझे सांगाती’चे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कुठे थांबायच हे मला कळत. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी समिती

शरद पवार म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक समिती नेमावी. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवर, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, झिरवळ आदी असतील. राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणार, सर्वांना सोबत घेऊ जाणारा, असा अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडताना, या सर्वांचा विचार करावा.

सार्वजनिक निवृत्ती नाही

आपण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहोत. ही सार्वजनिक निवृत्ती नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. गेली सहा दशके मी जनसामान्यांसाठी जे काम करत गेलो आहे, त्या सेवेत आताही खंड पडू देणार नाही. विकास, शेती अशा काही क्षेत्रासाठी मी आता अधिक वेळ देईल, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा,

लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. ‘लोक माझे सांगाती’, या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.