नवी दिल्ली-केंद्र सरकारने कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे. रिजिजू यांच्याकडे आता अर्थ व विज्ञान मंत्रालय देण्यात आले आहे. रिजिजू यांच्या जागी आता अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री असतील. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेत मेघवाल यांना स्वतंत्र पदभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मेघवाल यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देखील आहे. जुलै 2021 मध्ये रविशंकर प्रसाद यांच्या जागी रिजिजू यांची कायदा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
रिजिजू हे न्यायाधीशांवर केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते. निवृत्त न्यायमूर्तींबाबतही त्यांनी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की- काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत.
