मालक घराबाहेर पडताच मोलकरणीने केलं भयानक कांड;मुंबईतील खळबळजनक घटना

0
11

मुंबई:-मुंबईत उच्चभ्रू वस्तीमध्ये घर कामात मदत करण्यासाठी मोलकरीण ठेवली जाते. मात्र, मोलकरीण महिला तुमचं घर कधी साफ करतील याचा तुम्हाला पत्ता देखील लागणार नाही.मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी अशाच घरकाम करणाऱ्या महिला लुटारू टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी या तीन मोलकरणींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ३५ लाख रुपयांचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि महागडे घड्याळ देखील जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला संकुलात राहणारे फिर्यादी हे उन्हाळी सुट्टी निमित्त १४ एप्रिल ते सहा मे या काळात मुंबई बाहेर फिरण्यासाठी गेले होते.याच संधीचा फायदा घेऊन मोलकरणीने घरातील कपाटातील ३५ लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ चोरी करून धूम ठोकली. फिर्यादी जेव्हा सुट्टी वरून मुंबईत आपल्या घरी परतले तेव्हा घरात कपाटात या वस्तू आढळून आल्या नाहीत. चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.फिर्यादीच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका घरात छापा मारत आरोपींनी लपवून ठेवलेले 35 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ जप्त केले.

अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला मुंबई उपनगरातील वांद्रे परिसरात एका इमारतीत मोलकरीण म्हणून कार्यरत होती. ज्या घरात महिला कामावर होती तिथे मालक घराबाहेर काही काळ राहणार असल्याचे तिला समजले. त्यानुसार मोलकरणीने आपल्या इतर दोन महिला साथीदारांसोबत चोरीचा प्लॅन आखला होता.

दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच सांताक्रूझ भागात अशाच एका नोकराने पैशाच्या लालचेपोटी वयोवृद्ध नागरिकाची हत्या करून घरातील लाखो रुपये चोरी केले होते.तेव्हा नोकरांची कोणतीही पार्श्वभूमी किंवा इतिहास माहिती न करून घेताच नोकर घरी आणत असाल, तर ते तुमच्या मालमत्तेसाठी आणि जीवासाठी देखील जोखीम ठरू शकते.