देवदूत ठरणाऱ्या पोलिसांवरच दुर्दैवी वेळ,नाशिकमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःला संपवलं!

0
11

नाशिक,दि.20- शहरात आत्महत्यांचे सत्र काही कमी होताना दिसत नाही. तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिक आदी लोक टोकाचे पाऊल उचलत आहेत.अशातच नागरिकांची सुरक्षा ज्यांच्या हातात असते, त्या पोलीस प्रशासनातील कर्मचारी देखील आत्महत्या करत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात मागील दोन दिवसात दोन पोलिसांनी स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक शहरातील मसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तिन दिवसांपूर्वी घडली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेला दोन दिवस उलटलेले नाहीत, तोच आता आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्यांचे कारण समोर आलेलं नाही. शिवराम भाऊराव निकम असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर काल रात्री मनोज बोरसे या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःला संपवले आहे. या घटनेने पोलीस कुटुंबांसह पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजारपणामुळे आयुष्य संपवल्याची चर्चा

दरम्यान म्हसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक उपनिरीक्षक निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आत्महत्या केली. निकम यांनी पोलीस आयुक्तालयातील पंचवटी, सरकारवाडा, वाहतूक, विशेष शाखेत सेवा बजावली होती. काही महिन्यांपासून ते म्हसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. ड्युटीवर हजर होण्यापूर्वीच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पोलीस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.

ड्युटीवर असताना पोलिसाची आत्महत्या

तर दुसरी घटना पोलीस आयुक्तालयात घडली आहे. तोरणमाळ येथील पोलीस कर्मचारी मोहन बोरसे हे दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दाखल झाले होते. शहर पोलीस आयुक्तालयात मोटार वाहन विभागात कार्यरत होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. मात्र सकाळी पोलीस कर्मचारी गेले असता बोरसे यांनी शेडमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र बोरसे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. शहरात बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती आणि आज पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळ हादरले आहे. दरम्यान अशा पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.