आशिया प्रशांत मानवाधिकार मंचाच्या वार्षिक साधारण सभा आणि द्वैवार्षिक परिषदेचे भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

0
5

संहिताबद्ध कायद्यापेक्षा मानवाधिकारांचे सर्वार्थाने पालन करण्याची आंतरराष्ट्रीय समुदायावर नैतिक जबाबदारी – राष्ट्रपती मुर्मु

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर-आशिया प्रशांत मानवाधिकार मंचाच्या वार्षिक साधारण सभा आणि द्वैवार्षिक परिषदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे उद्घाटन झाले.

मानवाधिकार वेगळे करून त्यांकडे पाहू नका, मानवी कृत्यांमुळे ऱ्हास झालेल्या निसर्गाकडेही सारखेच लक्ष द्या, असे आवाहन राष्ट्रपतींनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. विश्वाचा प्रत्येक कण देवत्वाची अभिव्यक्ती आहे, असे भारतीय संस्कृतीत मानले जाते. निसर्गाप्रती आपले प्रेम वेळीच पुन्हा जागृत करून खूप उशीर होण्यापूर्वीच त्याचे संवर्धन करायला हवे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

मनुष्य हा जसा चांगला निर्माता आहे तसाच विनाशकही आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार पृथ्वीवरील प्रजातींच्या अस्तंगत होण्याच्या सहाव्या खेपेला सुरुवात झाली असून माणसाने चालवलेल्या विनाशात त्याचे मूळ आहे. हा विनाश वेळीच रोखला नाही तर मानवजातीसह पृथ्वीवरील इतर सजीवसृष्टीही नष्ट होईल. तेव्हा, संहिताबद्ध कायद्यापेक्षा मानवाधिकारांचे सर्वार्थाने पालन करण्याची नैतिक जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

या परिषदेत एक सत्र पूर्णपणे पर्यावरण आणि हवामान बदलाच्या विषयाला समर्पित करण्यात आले आहे, याबाबत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. मानवी समाज आणि पृथ्वीच्या भल्यासाठी सर्वसमावेशी घोषणापत्र या परिषदेत तयार होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासून आपल्या संविधानाने प्रौढांना मताधिकार दिला आहे, लिंगभेद दूर करण्याबाबत, सन्मानाने जगण्यासाठी विविध प्रकारे मूक क्रांतीत आपल्याला भागीदार होता आले आहे. महिलांसाठी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये किमान 33 टक्के आरक्षण आपल्या व्यवस्थेत आहे आणि आता अशाच प्रकारचा राज्य विधीमंडळे आणि देशाच्या संसदेत आरक्षणाचा प्रस्ताव आकारास येत आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. लिंगभेदापासून न्याय मिळवण्याच्या आपल्या या काळात हा क्रांतिकारक बदल ठरेल, असे त्या म्हणाल्या.

जगातील इतर भागांमध्ये असलेल्या मानवाधिकाराबाबतच्या उत्तमोत्तम पद्धतींकडून धडे घेण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे. मानवाधिकार संस्था व जगभरातील सर्व भागीदारांसह चर्चा घडवून आणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकारांबाबत सहमती मिळवण्यात आशिया प्रशांत प्रादेशिक मंचाला महत्वाची भूमिका बजावता येईल, या मुद्द्यावर राष्ट्रपतींनी भर दिला.

राष्ट्रपतींच्या भाषणाची लिंक