तलाठी परीक्षेच्या उमेदवारांसाठी उत्तरतालिका पाहण्याची सुविधा

0
41

पुणे:-राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तर उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे.

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

दरम्यान, ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम असणार असून, त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.