मुंबई, दि. ६ : गोरेगाव (पश्चिम) उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये जाऊन आगीतील जखमींची विचारपूस केली व त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.
गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालय, लाईफलाईन मेडीकल आणि कूपर रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या घटनेवर लक्ष असून, दुर्घटनाग्रस्तांवर वेळेत उपचार व मदतीसाठी शासन तत्पर असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. यावेळी आमदार विद्या ठाकूर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
०००