शिवसेना – राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारी संयुक्त सुनावणी

0
2

नवी दिल्ली – आमदारांच्या अपात्रतेबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय करावा, यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर संयुक्त सुनावणी उद्या १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात दिरंगाई होत असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या विधानसभाध्यक्षांकडून सुनावणीचे कोणते वेळापत्रक सादर केले जाईल, याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली होती. ठाकरे गटातर्फे सुनील प्रभू तर शरद पवार गटातर्फे जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकांवरील संयुक्त सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून या प्रकरणात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच सुनावणीसाठीचे वेळापत्रक विधानसभाध्यक्षांनी १७ ऑक्टोबरपर्यंत सादर करावे, असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे विधानसभा अध्यक्षांकडून पालन होत नसल्याचे फटकारताना तसेच वेळकाढूपणा न करता लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा. अन्यथा दोन महिन्यात निकाल देण्याचे आदेश द्यावे लागतील, अशी तंबी देखील सरन्यायाधीशांनी दिली होती.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या तंबीनंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीमध्ये सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेऊन कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केली होती. तसेच विधीमंडळाच्या सार्वभौमत्वाशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची ग्वाही दिली मात्र, निवडणुकीचा निकष लावून निर्णय देता येणार नाही असे स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार मंगळवारपर्यंत सुधारीत वेळापत्रक सादर करण्याबाबत योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असेही स्पष्ट केले होते. त्यापार्श्वभूमीवर सुनावणीच्या वेळापत्रकाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात काय सादरीकरण होईल, याबाबत कयास बांधले जात आहेत.