पुलगाव दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

0
11
विशेष प्रतिनिधी
पुलगाव/वर्धा, दि. 31 – देशातील सर्वात मोठे लष्करी शस्त्रसाठ्याचे ठिकाण असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) सोमवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर झालेल्या स्फोटात  लष्करच्या दोन अधिका-यांसह १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या १३ जवानांचा समावेश आहे. मृतांचा आकडा २२ च्या घरात जाण्याची शक्यता भांडारातील अग्निशमन दलाच्या जवानाने व्यक्त केली आहे. मृतांमध्ये कर्नल आर. एस. पवार आणि मनोज के. यांचा समावेश आहे.दरम्यान तहसिलादार तेजस्विनी यादव या रात्रीपासूनच परिस्थितीची माहिती वरिष्ठांना देत आहेत.
यातील १९ जखमींना वर्धा येथील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या घटनेचा अहवाल मागितला असून ते स्वत: पुलगाव येथे जाण्याची शक्यता आहे. आग नियंत्रणात आली असली तरी परिसरातील गावांमध्ये दहश्तीचे वातावरण आहे. दरम्यान लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग हे पुलगावसाठी रवाना झाल्याचे सुत्रांनी सांगितले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रशासनासोबत संपर्कात आहेत.
कॅम्प परिसरालगतच्या आगरगावातील १५००, पारधी बेडा २००, पिपरी ७० नागझरी १२०० तर मुरदगावातील १५० नागरिकांना देवळी, नांदोरा आणि पळसगाव येथे सुरक्षित स्थानी हलविण्यात आले आहे.कॅम्प परिसरालगतच्या नागझरी गावाच्या दिशेने सर्वप्रथम लागलेली आग हळू – हळू पसरु लागली. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आगीने भीषण रुप धारण करीत दारूगोळा भांडारात प्रवेश केला. रात्री २ वाजताच्या सुमारास पहिला स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.  कॅम्प परिसरालगतच्या १५ कि.मी. परिघातील गावांतील नागरिक  प्रचंड दहशतीत आहेत. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत होत्या. कम्प परिसरालगतच्या नागझरी , इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे १० गावांतील नागरिक देवळीच्या दिशेने जीव वाचवित पळू लागले.  घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत आर्वी, कारंजा, नागपूर आणि भूगाव येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.