पीएफ’मधून ५० हजार काढल्यास टीडीएस नाही

0
7

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) ५० हजार रुपये काढल्यास त्यावर एक जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून काढण्यात येणाऱ्या रकमेवर कपातीची मर्यादा ३० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली असून सरकारने यासंबंधी अधिसूचनाही जारी केली आहे.प्राप्तीकर कायदा १९६१च्या कलम १९२-ए मध्ये वित्तीय अधिनियमान्वये दुरुस्ती करून ही मर्यादा वाढविण्यात आली आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. ही तरतूद १ जून २०१६ पासून लागू होणार आहे.

कर्मचाऱ्यांनी मुदतीआधी पीएफमधून पैसे काढू नयेत आणि दीर्घ मुदतीच्या बचतीसाठी प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशातून सरकारने मुळातून प्राप्तीकर कपात (टीडीएस) करण्याचा नियम लागू केला होता. सध्याच्या तरतुदीनुसार पॅन नंबर दिलेला असेल तर, टीडीएस कपातीचा दर १० टक्के आहे. तथापि, १५ जी किंवा १५ एच फॉर्म संबंधित पीएफ सदस्य कर्मचाऱ्याने सादर केला असेल तर, टीडीएस कापला जात नाही. पीएफमधून रक्कम काढल्यास निवृत्तीनंतरचे एकूण उत्पन्न करपात्र नसेल, अशी घोषणा करण्यासाठी हे फॉर्म आहेत. साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ एच, तर त्यापेक्षा कमी वय असलेल्यांसाठी १५ जी हा फार्म आहे. पॅन किंवा हे दोन्ही फॉर्म सादर केलेला नसेल तर टीडीएस कपातीचा दर ३४.६०८ टक्के आहे.