अखेर महसुलमंत्री खडसेंचा राजीनामा

0
8
मुंबई- चार दिवसानंतर शुक्रवारी रात्री मुंबईत दाखल झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आज सकाळी 11 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षावर बंगल्यावर गेले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा वर्षावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, खडसे आणि मुनगंटीवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान, खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दुपारी 1 वाजता मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी खुद्द खडसे यांच्यासह रावसाहेब दानवे व इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
महसूलमंत्री एकनाथ खडसेंविरोधात गेल्या पंधरवड्यात लागोपाठ झालेल्या भ्रष्टाचारामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी पाकिस्तानातून झालेले कथित दूरध्वनी संभाषण, स्वीय सहायक गजानन पाटीलने मागितलेली 30 कोटींची लाच, जावयाचे लिमोझीन कार प्रकरण आणि पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील 3 एकर जमीन बेकायदेशीररीत्या लाटल्याच्या आरोपामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे चर्चेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर आहे. आपल्या सहकाऱ्यांनीही तसेच काम करावे, अशी त्यांची इच्छा असते. मात्र, तसे होताना दिसत नाही.